पनवेल : रामप्रहर वृत्त
दोन दिवसांपासून हलक्या सरींनी तालुक्यात जोर धरला आहे. शेतकर्यांची पेरणीची कामे पूर्ण होऊ लागली आहेत. रानावनात झाडींना पालवी धरू लागली आहे. अशा वातावरणात सर्वांना ओढ लागते ती रानभाज्यांची. काही दिवसांपासून रानात रानभाज्यांना बहर आला असून पनवेलसह जिल्ह्यांतील बाजारपेठांत रानभाज्या विक्रीसाठी दिसत आहेत. आवक वाढल्याने प्रति जुडी 10 रुपयांना मिळत आहे.
पावसाळ्यापूर्वी रानात कुडा, शेवला, आकुर इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात. या रानभाज्या खायला चविष्ट व पौष्टिक असतात. ठराविक ऋतूत येणार्या या भाज्या खवय्यांच्या पसंतीच्या असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. पावसाळा वाढत जाईल, तशा अनेक भाज्या तयार होणार आहेत. आदिवासी स्त्रिया रानावनात फिरून त्या मिळवतात. या भाज्या विकून त्यांना रोजगार मिळत असून, आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. सध्या याच रानभाज्यांची आवक वाढल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी 50 ते 60 रुपयांना तीन जुड्या मिळत होत्या. आता दहा रुपये प्रति जुडी मिळत आहे. पावसाळ्यात मिळणार्या या भाज्या खरेदी करण्यासाठी प्रवासी व नागरिक आवर्जून थांबून खरेदी करत आहेत. या भाज्यांवर विशेष संस्कार करून शिजवाव्या लागतात. काही तर उकडून शिजवून घ्याव्या लागतात. तर काहींमध्ये विशिष्ट प्रकारचा पाला मिसळावा लागतो. म्हणजे त्या खायला चवदार लागतात आणि बाधतही नाहीत.
रानात मिळणार्या भाज्या या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या दिवसातील आहेत. पाऊस जसजसा वाढत जाईल, तसतसे विविध भाज्या रानात मिळतील. पाच ते दहा रुपयांना जुडी विकली जाते.
-येनू जाधव, विक्रेता
पावसाळ्यात रानावनात तयार झालेल्या भाज्या चवदार असतात. त्या विविध प्रकारे शिजवल्या जात असून चविष्ट असतात.
-चंद्रभागा खडतर, रानभाज्या जाणकार