उरण : प्रतिनिधी
कोप्रोली परिसरात लागलेली कंटेनर ट्रेलरची रांग कोप्रोली येथील ऑलकार्गो गोदामापर्यंत लागत असल्याने संपूर्ण वाहतूक ठप्प होत आहे. सायंकाळच्या वेळी कामावरून येणार्या कामगारांना या मुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, तर गोदाम प्रशासनाचे अधिकारी अधिकाधिक कंटेनर हाताळणीचा व्यवसाय होऊन उत्पन्नात जास्तीत जास्त भर टाकण्याकडे लक्ष केंद्रित करून मोठ्या प्रमाणात कंटेनर आवक वाढवीत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्याचा त्रास येथील प्रवासी आणि पादचार्यांना भोगावा लागत आहे.
उरण सामाजिक संस्थेनेही ही वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी उरण पोलीस ठाणे व वाहतूक विभागाला निवेदन सादर केले आहे. अधिकार्यांनीही मार्ग सुकर करण्यासाठी लक्ष केंद्रित केले आहे, मात्र सायंकाळी काळोख पडण्याच्या वेळेत सदर अवजड वाहनचालक उलट-सुलट मार्गाने वाहने चालवीत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे.
उरण सामाजिक संस्थेच्या निवेदनामुळे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांनी या संदर्भात बैठकीचे आयोजन केले होते. या वेळी गोदाम व्यवस्थापकांना सक्त ताकीद देण्यात आली असून, यापुढे तुमच्या वाहनाचा रस्त्यावर अडथळा निर्माण झाल्यास संबंधित वाहनांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या बैठकीसाठी सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चव्हाण यांच्यासमवेत उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद भोसले, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार, माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर, विनोद म्हात्रे, या विभागातील गोदामांचे व्यवस्थापक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.