अलिबाग : प्रतिनिधी
कृषी दिनानिमित्त 1 जुलै रोजी रायगड जिल्ह्यात वृक्षलागवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत 800 झाडे लावण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 802 ग्रामपंचायती असून, त्यामध्ये सहा लाख 41 हजार 600 वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिली.
ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालये, आरोग्य केंद्र व उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तिर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे, समुद्र किनार्यावरील खुल्या जागेत, दरड प्रवण क्षेत्रातील डोंगर पायथ्याच्या ठिकाणी, पुरक्षेत्रातील गावामधील नदी किनार्यालगतच्या ठिकाणी ही वृक्षलागवड मोहीम प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला किमान 800 वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
वृक्षलागवड कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणार्या ग्रामपंचायती, शाळा, विद्यार्थी, कार्यालये, अधिकारी, कर्मचारी यांची स्पर्धा आयोजित करुन जास्तीत जास्त वृक्षलागवड व वृक्षसंगोपन करणार्याचा सत्कार करण्यात येणार आहे.
वृक्षलागवड कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तर, ग्रामपंचायत स्तरावर, स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेणेत यावा व वृक्षलागवड व संवर्धनासाठी शपथ देण्यात यावी, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
वृक्ष लागवडीसाठी रोजगार हमी योजने अंतर्गत खड्डे खोदणे, सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून मागणीप्रमाणे मोफत रोपे उपलब्ध करुन घेणे आणि शासकीय रोपवाटीका येथून ग्रामनिधी अंतर्गत व लोकसहभागातून रोपेखरेदी करण्यात यावी. या कार्यक्रमाची अंमलबजावणी तातडीने करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दत्तक रोपे वृक्षलागवड यादी, फोटोसह सादर करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
लावलेल्या रोपांचे होणार संगोपन
जिल्ह्यातील विशेषत: जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील सर्व इयत्ता चौथी ते आठवीपर्यंतच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक रोप व प्रत्येक शिक्षकाने किमान दोन रोपे आणि सर्व स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी किमान दोन रोपे दत्तक घेवून वृक्षारोपण करायचे आहे. त्याचप्रमाणे लावलेली रोपे कायमस्वरुपी जगविण्यासाठी त्यांच्याभोवती संरक्षक जाळी, बांबू किंवा लाकडाचे कुंपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.