Breaking News

आजार झाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही संगीत ऐका

तुम्हाला एखादा आजार झाला तर यापुढे डॉक्टर कडे जाऊन  विविध तपासण्या  करणे , त्यासाठी भरमसाठ फी देणे आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये आणि महागडी औषधे घेण्याची गरज आता तुम्हाला भासणार नाही.कारण  या सगळ्या पासून तुमची सुटका करण्याचा निर्णय आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यापुढे कोणत्याही रुग्णालयात गेलात तर नर्स हातात औषधाचा ट्रे घेऊन फिरताना दिसणार नाही. तुम्हाला प्रत्येक वार्डात औषधाचा वास येणार नाही तर ती तुम्हाला संगीत म्हणताना दिसली तर नवल वाटणार नाही.तुम्हाला बरे वाटत नाही तुम्ही भारतीय संगीत ऐका आणि चमत्कार पहा तुमचा रोग बरा होईल. यासाठी आपल्या भावी पिढीला खास अभ्यासक्रम आता शिकवला जाणार आहे. 

या 2019-20 शैक्षणिक वर्षा पासून अकरावी आणि पुढील वर्षी बारावीची पाठयपुस्तके बदलणार आहेत. शालेय स्तरावर ज्याप्रमाणे प्रत्येक इयत्तेत विद्यार्थ्यांला काय यावे, कोणत्या क्षमतांचा विकास व्हावा यादृष्टीने काय अध्ययन करावे याचे  निकष  केले आहेत तसेच अकरावी आणि बारावीसाठीही निकष तयार करण्यात आले आहेत.  क्षमता विधाने म्हणून हा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. या क्षमता विधानानुसार पाठयपुस्तके तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये  भारतीय संगीत या विषयात वादग्रस्त असलेल्या संगीतोपचार पद्धतीचा समावेश करण्यात आला आहे.  यामुळे अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आली आहे.  संगीत कला शिकण्यासाठी अनेक महान कलाकारांनी आपले आयुष्य वेचले असताना बारावीचे विद्यार्थी  दोन वर्षात उपचार करण्याची क्षमता कशी वृद्धिंगत  करणार, हे फक्त राज्याच्या शिक्षण विभागालाच माहीत.

संगीताच्या माध्यमातून उपचार होऊ शकतात किंवा संगीत ऐकून रुग्णाला बरे वाटते याबद्दल अनेक मतभेद आहेत . त्यावर सातत्याने चर्चा होत असतांना संगीतोपचार ही मान्यताप्राप्त उपचार पद्धती आहे असे मानण्यात आलेले नाही असे असतानाही शिक्षण विभागाने मात्र त्याचा  अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. अकरावी, बारावीला ‘भारतीय संगीत’ हा विषय शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत होईल,’ असा अजब दावा राज्याच्या शिक्षण विभागाने केला आहे.

शिक्षण विभागाने शनिवारी (4 मे)  रोजी हा आराखडा जाहीर केला. अकरावी, बारावीच्या सर्वच विषयांसाठीची क्षमता विधाने जाहीर करण्यात आली आहेत. त्यावर 10 मेपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. बालभारतीच्या संकेतस्थळावर हरकती नोंदवता येणार आहेत. दरम्यान हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी अवघे पाचच दिवस मिळत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली  आहे.

या आराखडयातील क्षमता विधाने पुढील प्रमाणे आहेत.

1. अभिजात संगीताचे अध्ययन करताना विविध आजारांवर संगीतोपचार करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे

2. संगीतातून रोगमुक्ती होऊ शकते, याची अनुभूती घेणे

3. शरीरातील विविध अवयव, विविध व्याधी आणि संगीत यांचा चिकित्सक पद्धतीने अभ्यास करणे

4. एखाद्या नवीन वाद्याची निर्मिती करण्याचे कौशल्य विकसित करणे

5.  विविध जाहिरातींच्या जिंगल्स ऐकून नवनिर्मिती करण्याची क्षमता वृद्धिंगत करणे

6. राष्ट्रभक्तीपर गीतांतून विद्यार्थ्यांत राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढील लावणे

संगीतातून आजार बरे होतात असा दावा आपल्या शिक्षण विभागाने केला आहे. ‘संगीतातून रोगमुक्ती होऊ शकते याची अनुभूती घेणे’ या मुद्दयाचा आराखडयात समावेश करण्यात आला आहे. शरीरातील व्याधी, अवयव यांची चिकित्सा आणि संगीत यांचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. दरवर्षी जवळपास 10 हजार विद्यार्थी ‘भारतीय संगीत’ हा विषय घेऊन बारावीची परीक्षा देतात. 2017 – 18  या शैक्षणिक वर्षात  राज्यातील 9 हजार पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी ’ भारतीय संगीत ’ हा विषय घेतला होता. शास्त्रीय संगीत, सुगम संगीत या विषयांची परीक्षाही 8 हजार पेक्षा जास्त  विद्यार्थ्यांनी दिली होती. राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मान्यता नसलेल्या उपचार पद्धतीचे शिक्षण देण्याचा दावा आता शिक्षण विभाग करत आहे.

या वादग्रस्त उपचार पद्धतीबरोबरच इतरही अनेक मजेशीर  विधाने शिक्षण विभागाने केली आहेत. राष्ट्रभक्तीपर गाणी ऐकून राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढीस लागेल, असे ही विभागाचे म्हणणे आहे. त्याचबरोबर या आराखडयात  कथ्थक या नृत्यप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. मात्र दक्षिण भारतातील कोणत्याही नृत्य प्रकाराचा समावेश नाही. यावरून अद्याप कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या संगीतोपचारांचा समावेश  अभ्यासक्रमातच  करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागणे केल्याचे उघड होत  आहे . बालभारतीचे संचालक, डॉ. सुनील मगर यांनी याबाबत बोलताना सांगितले की,   क्षमता विधाने म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता विकसित व्हाव्यात त्याची रूपरेषा आहे. ती तज्ज्ञांनी तयार केली असून  हरकती आणि सूचनांसाठी ती प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याबाबत येणार्‍या सूचनांनुसार बदल केले जातील. त्यामुळे कोणत्याही मुद्दयाबाबत कुणालाही काहीही हरकत असल्यास ती नोंदवण्यात यावी.

-नितीन देशमुख

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply