केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंची टीका
मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे आपल्यासोबत जवळपास 40 हून अधिक आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
शिवसेनेला सत्तेतून खाली खेचल्याचा आनंद संजय राऊत यांना झाला असेल, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. संजय राऊत खूश, कारण त्यांना शिवसेनेला सत्तेवरून खाली खेचल्याचा व शिवसेनेला संपवल्याचा आनंद झाला असेल. कपटी, कारस्थानी व दुष्ट बुद्धीच्या माणसाची ही कटकारस्थाने, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. त्याचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.
खरंतर, मंगळवारी शिवसेनेचे नेते एकनाथ खडसे आणि उद्धव ठाकरे यांच्या फोनवरून चर्चा झाली होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे संजय राऊतांबद्दल नाराजी व्यक्त केली होती. संजय राऊत हे प्रत्यक्षात एक आणि माध्यमांसमोर दुसरं बोलत असल्याचा आरोप शिंदे यांच्याकडून करण्यात आला होता. याच मुद्यावरून नारायण राणे यांनी संजय राऊतांवर टीकास्त्र सोडले आहे.
‘पक्ष चालवणे हे उद्धव ठाकरेंचे काम नाही’
भाजप नेते निलेश राणेंनी सध्या शिवसेनेसोबत एकूण 11 ते 12 आमदार असल्याचे चित्र दिसत असल्याचा संदर्भ देत या आमदारांना घेऊन आयपीएलप्रमाणे क्रिकेटचा संघ सुरू करावा असा खोचक सल्ला दिलाय, तसेच पक्ष चालवणे हे उद्धव ठाकरेंचे काम नाही असेही निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलेय.