Breaking News

ईव्हीएमवर आमचा भरवसा नाय, भरवसा नाय

’ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय, आमचा भरवसा नाय ’ या गाण्याचे सुर शरद काकांनी बारामतीतून आळवायला सुरुवात करताच इंजिनाच्या धक धक बरोबर ते ममतादीदी पर्यन्त पोहचले प. बंगाल मधून ममतादीदीनी ही ते आळवायला सुरवात केली. काँग्रेसवाल्यांनी त्याला कोरस मध्ये साथ दिली. पण निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे लक्ष न देता ईव्हीएम मशीनवरच भरोसा ठेवून निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण केल्यावर बारामतीकरांना भीती वाटू लागताच त्यांनी सावध पवित्रा घेऊन पराभव झाल्यास आपला निवडणूक पध्दतीवरचा विश्वास उडेल असे म्हणायला सुरुवात केली.     

सीबीएससी बोर्डाचा बारावीचा निकाल दोन दिवसापूर्वी लागला. आपल्या पनवेलच्या डीएव्ही शाळेचा शशांक नाग हा विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आला. आता या महिन्याच्या शेवटी आपल्या महाराष्ट्र बोर्डाच्या आणि नंतर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लागतील हे समजल्यावर आमच्या सोसायटीत ही  बाबल्या आणि त्याच्या मित्रांनी आमचा परीक्षा पध्दतीवर भरवसा नाय, भरवसा नाय म्हणायला सुरुवात केली. यावेळी आपण नापास झालो तर आपला परीक्षा पध्दतीवरचा विश्वासच उडेल असे ते सगळ्या सोसायटीला सांगत सुटले. खरे कारण ( कॉपी करायला न मिळाल्याने ) त्यांना परीक्षेचे पेपर थोडे कठीणच गेले आहेत.

अरे, तुम्ही अभ्यासच केला नसेल तर नापास होणारच मग परीक्षा पध्दतीवरचा विश्वास उडेल कशाला म्हणता असे म्हणताच लगेच बाबल्या म्हणाला अरे, आपले बारामतीवाले शरद काका म्हणतात सुप्रिया पडली तर आपला निवडणूक पध्दतीवरचा विश्वास उडेल. ते निवडणुकीपूर्वी एवढा अभ्यास करतात. आपल्या राज्याच्या कानाकोपर्यात फिरून माहिती गोळा करतात. निवडणूक लढवण्यासाठी हाताची, कपबशीची आणि  शिवाजी पार्कच्या इंजिनाची ही मदत घेतली तरी त्यांना पराभव होईल अशी भीती वाटल्यावर त्यांनी निवडणूक पध्दतीवर आणि ईव्हीएम मशीनवरचा आपला विश्वास उडेल असे सांगितले. आता आपल्या बारामतीकर शरदकाकांनी निवडणूक पध्दतीवर आणि ईव्हीएम मशीनवरचा विश्वास उडेल म्हटल्यावर आपण तरी नापास झाल्यावर  बोर्डाच्या परीक्षा पध्दतीवर विश्वास कसा ठेवायचा सांग ना ?  

आता तूच सांग, ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करण शक्य आहे का? मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वी उमेदवारांच्या प्रतिंनिधींसमोर  उमेदवारच्या नावा समोरील बटण दाबून मत त्यालाच पडते आहे की नाही याची खात्री केली जाते त्यानंतर ते मशीन त्यांच्या समोर सील केले जाते. मतदान संपल्यावर ही मशीन सील करून त्यावर प्रतीनिधींच्या सह्या घेतल्या जातात. त्यातच आता व्हीव्हीप्याट मशीन मध्ये आपण दिलेल्या उमेदवारालाच मत पडले की नाही ते दिसते. एवढे सगळे असताना शरदकाका पराभव झाल्यास निवडणूक पध्दतीवर आणि ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही म्हणतात मग आमचे पेपर तपासणारे तर शिक्षक असतात. ते काय आमच्या समोर पेपर तपासत नाहीत.  त्यांना पेपर तपासायला एकाच जागी बसायला सांगतात (तरी गेल्या वर्षी हॉटेलात पेपर तपासतानाचा व्हिडिओ मिळाला होता) या कामाचा मोबदला कमी मिळतो आणि तो वेळेवर मिळत नाही अशी त्यांची कायम तक्रार असते. काही दिवसापूर्वी एका शाळेतून उत्तर पत्रिकांचे गठ्ठे घेऊन जाताना काही उत्तर पत्रिका रस्त्यात पडल्याची बातमी आली होती. असे अनेक प्रकार घडत असताना आम्ही  नापास झालो तर तूच सांग आमचा परीक्षा पध्दतीवरचा विश्वास उडणारच ना. मग आमचा परीक्षा पध्दतीवर भरवसा नाय म्हटले तर काय चुकले ? सांग ना.    

आपल्या शरद काकांनी मशीन बद्दल शंका व्यक्त केल्यावर सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली. काँग्रेसचे नेते सर्वोच्च न्यायालयातील वकील कपिल सिब्बल यांनी तर परदेशात जाऊन स्वत: पडद्यामागे उभे राहून मशीन हॅक करता येते असे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे ही  बरोबरच आहे कारण हे मशीन त्यांच्याच राजवटीत वापरण्यास सुरुवात झाली. त्यावेळी बहुतेक त्यांनी त्यामध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तो फसल्यामुळे कमळाबाईचा विजय झाल्याचे दुख: त्यांना सहन ही होत नाही आणि सांगता ही येत नाही. त्यामुळे त्यांनी शरद काकांप्रमाणे ईव्हीएम मशीनवर आमचा भरवसा नाय आळवायला सुरुवात केली. पण मग गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला विजय कशामुळे झाला याचा खुलासा ही त्यांनी करायला हवा ना. -नितीन देशमुख

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply