Breaking News

शोभिवंत फुलझाडांनी जेएनपीए महामार्ग बहरला

उरण : प्रतिनिधी

जेएनपीए-गव्हाण फाटा, कळंबोली- जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4 बी आठ पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर सुमारे दोन लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी लागवड करण्यात आलेली फुलझाडे चांगलीच बहरली आहेत. या आकर्षक फुलझाडांमुळे दररोज या महामार्गावरून ये-जा करणार्‍या 15 हजारांहून अधिक वाहतुकदार, प्रवासी, नागरिकांचा प्रवास आकर्षक आणि डोळ्यांनाही सुखावणारा ठरू लागला आहे.

जेएनपीए-मुंबई पोर्ट रोड कंपनीच्या माध्यमातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बंदरातील वाढती अवजड वाहतूक सुकर व्हावी आणि वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीएदरम्यान असलेल्या गव्हाणफाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-4 बी महामार्गावर सात उड्डाणपूल, एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी रस्ते तयार करण्यात आले आहेत. सुमारे तीन हजार कोटी खर्चाचे काम नॅशनल हायवे अथॅरिटीकडे सोपविण्यात आले आहे.

यापैकी उड्डाणपूलाची काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर उर्वरित जेएनपीटी-गव्हाण फाटा आणि कळंबोली-जेएनपीटी-पळस्पे या एनएच-4 बी राष्ट्रीय महामार्गावरील सहा-आठ पदरी 42 किमी लांबीच्या रस्त्यांची कामे पुर्ण झाली आहेत. परिसरातील वाढत्या प्रदूषणाचे संतुलन साधण्यासाठी जीव्हीकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या या जेएनपीएदरम्यान असलेल्या गव्हाण फाटा-जासई-करळ-द्रोणागिरीदरम्यान राष्ट्रीय एनएच-4 बी महामार्गावर एलिव्हेटेड कॉरिडॉर आणि आठ पदरी महामार्गावरील रस्त्यांच्या दुभाजकावर सुमारे दोन लाख शोभिवंत फुलझाडे लावण्याची योजना आखण्यात आली होती.

यामध्ये कन्हेरी फुलझाडांच्या जातीतील बिंटी, बोंगणवेल, टिकोमा, तगर, जास्वंद, पॅरेलॉनकस आदी आकर्षक फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रस्ते उभारणीसह फुलझाडांची लागवड आणि देखभाल करण्याचे कामही जीव्हीकेकडे सोपविण्यात आले आहे. या  महामार्गावर आणि सहा-आठ पदरी रस्त्यांच्या दुभाजकावर लावण्यात आलेली शोभिवंत आकर्षक फुलझाडांची मागील दोन वर्षात चांगलीच बहरली, फोफावली आहेत.

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मदत

या महामार्गावरील लावण्यात आलेल्या आकर्षक व विविध प्रकारच्या शोभिवंत फुलझाडांच्या लागवडीमुळे महामार्गावरून ये-जा करणार्‍यांना प्रसन्नता लाभते. तसेच परिसरात ढासळत्या पर्यावरणाचे संतुलन राखण्यासही मोलाची मदत होत आहे. शिवाय दुभाजकांवर लावण्यात आलेल्या फुलझाडांमुळे रात्रीच्यावेळी परस्पर विरुध्द धावणार्‍या वाहनांच्या लाईटसचे रिप्लेक्शन एकमेकांवर न पडण्यासही मदत मिळते. त्यामुळे रात्रीच्या वेळी लाईटस् रिप्लेक्शनमुळे होणारे अपघात कमी होण्यास मदत मिळत असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापक यशवंत घोटकर यांनी दिली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply