Breaking News

देवेंद्र फडणवीस उद्यापासून अतिवृष्टीग्रस्त भागाच्या दौर्‍यावर

शेतकर्‍यांच्या नुकसानीची करणार पाहणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अतोनात नुकसान झाले असून, बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आणि शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. सोमवार (दि. 19)पासून त्यांच्या दौर्‍याला प्रारंभ होईल.
देवेंद्र फडणवीस सोमवारी बारामतीपासून आपला दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परंडा आदी ठिकाणी दौरा करून ते उस्मानाबादकडे रवाना होणार आहेत. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी  उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यांतील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. तिसर्‍या दिवशी बुधवारी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत नऊ जिल्ह्यांमध्ये सुमारे 850 किमीचा प्रवास फडणवीस करणार आहेत.
दरम्यान, राज्यभरात शेतकर्‍यांच्या नुकसानीची झालेली व्याप्ती पाहता ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना थेट मदत देण्यात यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारीच केली आहे. या संदर्भात फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ‘गेल्या तीन-चार दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तो मदतीसाठी आर्जव करीत आहे. विविध वाहिन्यांवर शेतकर्‍यांचे अश्रू आणि व्यथा पाहून अतिशय वेदना होतात, पण राज्य सरकारला अजूनही पाझर फुटायचे नाव नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत या पलिकडे काहीही शब्द सरकारकडून दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामेही होत नाहीत आणि शेतकर्‍यांना मदत तर मिळतच नाही. अन्नदात्याला पूर्णपणे वार्‍यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे, अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका केली आहे.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply