Breaking News

शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात मिशन झिरो ड्रॉपआऊट

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून 5 ते 20 जुलै या कालावधीत मिशन झिरो ड्रॉपआऊट राबवले जाणार आहे. या अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे. मिशन झिरो ड्रॉपआऊट योजनेअंतर्गत विविध स्तरावर समित्या आणि समन्वकांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेतील जन्म-मृत्यू कागदपत्रांचा आधार घेऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल, तसेच तात्पुरत्या स्थलांतरित कुटुंबातील मुलांची, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरित होणार्‍या मुलांची, अन्य वस्तीतून शाळा वस्तीत स्थलांतरित होणार्‍या मुलांची माहिती घेतली जाईल. ग्रामस्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन गावातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल, याची काळजी घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागासह महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय, महिला आणि बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विभाग, अल्पसंख्यांक विभाग, गृह आणि आरोग्य विभागाचा या उपक्रमात सहभाग आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मार्च 2021 आणि त्या पूर्वीही सर्वेक्षण करण्यात आले होते. कोरोना काळात विद्यार्थी शाळा सोडत असल्याचे, शाळाबाह्य असल्याचे निदर्शनास आले. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे, विशेषतः मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. अपंग मुलांसमोरील आव्हाने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

सर्वेक्षण करण्यात येणारी ठिकाणे

घरोघरी जाण्यासह बस स्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठ, वीटभट्ट्या, दगडखाणी, साखर कारखाने, स्थलांतरित कुटुंबे, मागास, वंचित, अल्पसंख्याक गटातील वस्त्या, राज्यातील सर्व खेडी, गाव, वाडी, तांडे, पाडे, शेतमळे, जंगल, बालगृह, निरीक्षण गृह, विशेष दत्तक संस्था आदी ठिकाणी जाऊन शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या नोंदी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

Check Also

आमदार महेश बालदी यांचा विविध वाड्यांमध्ये प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा प्रचार सभा प्रमुख प्रवीण काळबागे, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर घरत …

Leave a Reply