कर्जत : प्रतिनिधी
कर्जत येथील चित्रकार सुनील परदेशी यांची न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. हा सन्मान मिळवणारे ते भारतातील दुसरे चित्रकार ठरले आहेत. पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची स्थापना फ्लोरा बी गिफुनी यांनी 1972मध्ये केली. ही संस्था अमेरिकेतील सर्वात जुनी पेस्टल सोसायटी आहे. न्यूयॉर्कमधील पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका या आंतरराष्ट्रीय कला-संस्थेकडून सुनील परदेशी यांची ’सिग्नेचर मेंबर’ म्हणून निवड करण्यात आली आहे. यापूर्वी कर्जतचे जागतिक दर्जाचे ख्यातनाम चित्रकार पराग बोरसे यांना हा बहुमान मिळाला आहे. कर्जत शहरातील चित्रकार सुनील परदेशी हे चिक्की उत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यांनी कलेचे शिक्षण बांद्रा- मुंबईतील रहेजा स्कूल ऑफ आर्टमध्ये घेतले असून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबई, पुणे येथे झाली आहेत. त्यांची अनेक चित्रे सातासमुद्रापार गेली आहेत. त्यांना रंगवली काढण्याचा छंद आहे.
पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका याचा सन्माननीय सदस्य हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून माझे कुटुंबिय व सर्व हितचिंतकांचा सन्मान आहे. येणार्या काळात, उत्तमोत्तम कलाकृती सादर करण्याचा व सर्व रसिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.
-सुनील परदेशी, चित्रकार, कर्जत