पनवेल : बातमीदार
कोरोनाकाळात मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती वर्धक औषधे, ऑक्सिमीटर, थर्मल गन, आणि इतर औषधांचा काही औषध दुकानांकडून काळा बाजार करीत एमआरपीच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ग्राहकाकडून वसूल केली जात आहे. पाच हजारांपर्यंत असलेल्या थर्मल गनची खुल्या बाजारात आठ हजार रुपये लावण्यात आले आहेत, तर ऑक्सिमीटरची किंमत देखील दुप्पट आहे. औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य शासनाने या संदर्भात कारवाई करण्याची मागणी होत आहे.
कट प्रॅक्टिसच्या नावाखाली औषध कंपन्यांचीही रुग्ण ग्राहकांकडून लुबाडणूक सुरू आहे. टाळेबंदी लागू करण्यात आल्यापासून अत्यावश्यक सेवा म्हणून औषधाची दुकाने सुरू ठेवण्यात आलेली आहेत. तेव्हापासून मुखपट्टी, जंतुनाशके, रोगप्रतिकारशक्ती औषधांचा साठा नाही असे सांगून ग्राहकांची लूटमार होत होती. आता टाळेबंदी उठल्यानंतरही लूटमार काही प्रमाणात कमी झाली असली तरी थर्मल गन व ऑक्सिमीटरसारख्या अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यामध्ये लुबाडणूक सुरू आहे.
शासनाने आता ‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ही मोहीम हाती घेतली आहे. यानुसार दररोज घराबाहेर पडणार्या नोकरदार नागरिकानेही आता ही थर्मल गन व ऑक्सिमीटर हे साहित्य आपल्या कुटुंबासाठी खरेदी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे जवळपास चार हजार रुपयांचे ऑक्सिमीटर हे आठ हजार रुपयांना विकले जात आहे. हे वैद्यकीय साहित्य आता सर्वसामान्यांच्या घरातदेखील आढळून येत आहे. त्याचबरोबर थर्मल गन शरीरातील तापमान तपासण्यासाठी विकत घेतली जात आहे. या दोन्ही वस्तूंचा काळा बाजार सुरू असून अन्न व औषध प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष सुरू आहे. खासगी रुग्णालयांनंतर औषध दुकानांनीही या वैद्यकीय वस्तूंच्या विक्रीमध्ये लूट सुरू केली प्रशासनाने तपासणी करावी, अशी मागणी केली जात आहे.
रुग्णालयांचेही लेखा परीक्षण
शहरातील खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णांची आर्थिक लूट सुरू केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना त्यांचे जादा वसूल करण्यात आलेले 32 लाख रुपये परत देण्यात आले आहेत. ही संख्या आणखी वाढणार आहे. त्यासाठी पालिकेचे एक पथक तयार करण्यात आले असून आतापर्यंत कोविड रुग्णांच्या शुल्काचे मेडिकल ऑडिट केले जात आहे.
औषध दुकानांच्या या जादा किंमत घेण्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. त्यांच्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात येणार असून पालिका प्रशासनदेखील लक्ष ठेवणार आहे. अशा प्रकारे ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक करणार्या कोणत्याही घटकाकडे दुर्लक्ष केले जाणार नाही.
-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका