पेण : प्रतिनिधी
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वडखळ-शिर्की रस्त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांच्याबरोबरच केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनीदेखील हिरवा कंदील दाखविल्याने या रस्त्याच्या अंतिम मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे. या रस्त्याबरोबरच वाशी नाका ते डोलवी या सर्व्हीस रस्त्याच्या दुरुस्तीसाठीदेखील नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शविला आहे. पेण खारेपाट विभागातील जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या वडखळ ते शिर्की रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असल्याने बोरी, शिर्की, शिंगणवट गावातील नागरिकांना, वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत आमदार रविशेठ पाटील यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत वडखळ ते बोरी, शिर्की व शिर्की चाळ नं.2 या 9.600 किमी रस्त्यासाठी आठ कोटी 34 लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याची मागणी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी तसेच केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने पंतप्रधान ग्रामसडक कार्यालय अलिबाग यांनी या रस्त्याचा आठ कोटी 34 लाख रुपयांचा आराखडा तयार करून तो पंतप्रधान ग्रामसडक कार्यालयाचे कार्यकारी अभियंता पनवेल व अधीक्षक अभियंता, मुंबई यांच्याकडून मंजूर होऊन अंतिम मंजुरी साठी दिल्ली येथे गेला आहे. या रस्त्याबाबत उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या सह मसदचे सरपंच बळीराम भोईर, शिर्कीच्या सरपंच तेजस्विनी गणेश पाटील यांनी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत तसेच वडखळ ते कांदळेपाडा, उचेडे मळेघर ते वाशीनाका (सर्व्हीस रोड) व पनवेल-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाबाबत निवेदन देण्यात आले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील या रस्त्या बाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला असल्याने आमदार रविशेठ पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या बरोबरच पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत आमदार रविशेठ पाटील यांनी प्रस्तावित केलेल्या पेण मतदार संघातील सुधागड तालुक्यातील पाछापूर ते दर्यागाव ठाकूरवाडी या 3 किमी रस्त्याची तसेच भैरव ते दर्यागाव ठाकूरवाडी हा साडेचार किमीच्या रस्त्याबाबतदेखील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन भाजपच्या शिष्टमंडळाला दिले.