Breaking News

नव्या सरकारने पहिली लढाई जिंकली

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले शिवसेनेचे राजन साळवी यांना धूर चारली. यानिमित्ताने नवे शिंदे-फडणवीस सरकार पहिल्याच परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. विधानसभा अधिवेशनाचे कामकाज सुरू होताच राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड करावी असा प्रस्ताव भाजपकडून चंद्रकांत पाटील यांनी मांडला. त्याला गिरीश महाजन यांनी अनुमोदन दिले, तर महाविकास आघाडीकडून चेतन तुपे यांनी राजन साळवी यांचा प्रस्ताव मांडला व संग्राम थोपटे यांनी त्याला अनुमोदन दिले. यानंतर झालेल्या निवडणुकीत नार्वेकर यांचा विजय झाला. नार्वेकर यांना भाजप, शिंदे गट आणि अपक्ष अशी एकूण 164 मते मिळाली, तर पराभूत उमेदवार राजन साळवी यांना 107 मते पडली. समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि रईस शेख तसेच एमआयएमचे शाह फारुख अन्वर हे आमदार तटस्थ राहिले. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे मे महिन्यात निधन झाल्याने एक पद रिक्त आहे, तर राष्ट्रवादीचे अन्य दोन आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक सध्या तुरूंगात असल्याने ते उपस्थित नव्हते. याशिवाय राष्ट्रवादीचे निलेश लंके, दिलीप मोहिते, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, बबन शिंदे हे विविध कारणांमुळे मतदानास येऊ शकले नाहीत. भाजपचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक आजारी असल्याने मतदानास उपस्थित राहू शकले नाही, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे व जितेन अंतापूरकर आणि एमआयएमचे मुफ्ती इस्माईल गैरहजर होते. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या राहुल नार्वेकर यांचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री म्हणून विधिमंडळातील पहिल्याच भाषणात बोलताना एकनाथ शिंदे यांनी टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. महाराष्ट्रात आज भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चालले आहे. राज्यानेच नाही, तर देशाने या घटनेची नोंद घेतली, असेे ते म्हणाले. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नार्वेकर यांचे अभिनंदन केले. आज महाराष्ट्राने एक नवीन विक्रम केला आहे. सन्मानीय अध्यक्ष राहुल नार्वेकर हे महाराष्ट्राच्या इतिहासातील तर सर्वांत तरुण अध्यक्ष आहेतच, पण देशाच्याही इतिहासातील सर्वांत तरुण अध्यक्ष आहेत, असे फडणवीसांनी सांगत त्यांचे कौतुक केले.

आज बहुमत चाचणी : विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीच्या निमित्ताने नवे सरकार पहिली परीक्षा पास झाले आहे. आता सोमवारी (दि. 4) विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले आहे. यातील रविवारच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक झाल्यानंतर सोमवारी दुसर्‍या दिवशी बहुमत चाचणी होईल.

सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष –

मुंबईतील कुलाबा मतदारसंघाचे आमदार असलेले राहुल नार्वेकर (वय 45) आतापर्यंतचे सर्वांत तरुण असे विधानसभा अध्यक्ष बनले आहेत. गेल्या वर्षी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपद रिक्त होते. उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच अध्यक्षपदाचा कामकाज पाहत होते. आता नार्वेकरांची निवड झाल्यानंतर अध्यक्षपदाचा कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

विधिमंडळावर सासरे-जावयाचे राज्य –

भाजपचे राहुल नार्वेकर यांची महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ते विधानसभेचे 20वे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आता विधिमंडळावर सासरे-जावयांचे राज्य असणार आहे, कारण पेशाने वकील असलेले राहुल नार्वेकर हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई आहेत. त्यामुळे विधान परिषदेत सासरे, तर विधानसभेत जावयाचे वर्चस्व असणार आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply