कर्जत : बातमीदार
नेरळ-ममदापूर विकास प्राधिकरण क्षेत्रामधील ममदापूर गाव आणि परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. या भागातील रस्त्यांची स्थिती खड्डेचखड्डे चहूकडे अशी झाली असून, या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांची कामेदेखील कासवगतीने सुरू असल्याने स्थानिक रहिवाशी संतप्त झाले आहेत. ममदापूर हे रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रातील महत्त्वाचे गाव आहे. या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत असून नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसकांना जादा चटईक्षेत्र मिळत असल्याने ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रहिवाशी क्षेत्र उभे राहत आहे. या परिसरात किमान दोन हजार नवीन घरांची निर्मिती झाली असून त्यांना सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी नेरळ-ममदापूर विकास प्राधिकरणाची आहे. या प्राधिकरणाकडे मोठा निधी शिल्लक आहे. मात्र अनेक वर्षे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या प्रतीक्षेत असलेल्या ममदापूर भागातील रस्त्याची कामे प्राधिकरणाने केली नाहीत. त्यामुळे येथील रस्त्यावर खड्डेच खड्डे बघायला मिळत आहेत. या रस्त्यांवरुन चालणेदेखील अवघड झाले आहे.