कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
शहरातील हुतात्मा कोतवाल व्यायामशाळा व मैदान वाचवण्यासाठी हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर बचाव समिती तर्फे अॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. व्यायाममंदिराच्या संचालक मंडळाने या मैदानाचा व्यावसायिक वापर करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्यानंतर जुन्या व्यायामपट्टुंनी त्याला जोरदार आक्षेप घेत संघर्ष समिती स्थापन केली आहे.
कर्जत शहरात सन 1872 पासून हुतात्मा कोतवाल मैदान अस्तित्वात असून, ती एकमेव जागा इतर जागांप्रमाणे लिलावात देण्यात आलेली नव्हती. सन 1966ला हे मैदान हुतात्मा कोतवाल व्यायाममंदिर या संस्थेस एक रुपया भू-भाड्याने देण्यात आले. आजवर ते मैदान सुस्थितीत आहे. तहसील कार्यालयाने ही जागा कब्जे हक्काने संस्थेच्या नव्याने अस्तित्वात आलेल्या नियामक मंडळाला दिल्यानंतर संस्थेने हे मैदान आहे, ही माहिती दडवून धर्मादाय आयुक्तांकडून तेथे 19 गाळे बांधण्याची परवानगी मिळवली व त्यातील काही गाळे विकासकाला देऊन ते विकण्यास परवाना मिळविला होता. कर्जतमधील सुजाण नागरिकांनी त्याला पाच महिने सातत्याने विरोध केला. अखेर बांधकाम परवानगी अर्ज व धर्मादाय आयुक्त यांनी दिलेली बांधकाम परवानगी याच्यात तफावत आढळल्याने कर्जत नगरपरिषदेने मे महिन्यात बांधकाम परवानगी नाकारली होती. या प्रकरणी बचाव समिती तर्फे अॅड. हृषिकेश जोशी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून, त्यात संस्थाचालक व मैदानाच्या विकासकासह संबंधित सरकारी यंत्रणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. हा एक सुनियोजित घोटाळा असून यामध्ये विविध व्यक्ती, संस्था व सरकारी अधिकारी सहभागी आहेत. या प्रकरणाचा हा तपास उच्च स्तरावरील शासकीय यंत्रणेकडून होणे गरजेचे आहे. कर्जत नगर परिषदेचा बांधकाम विभाग व इतर सरकारी अधिकारी यांच्यावर भरवसा नसल्याने व या मैदानावर परत बांधकाम होऊ नये यासाठी तसेच धर्मादाय आयुक्त यांनी दिलेली परवानगी कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी व संस्थेवर प्रशासक नेमण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय नव्हता, असे या याचिकेत म्हटले आहे. याबाबत लवकरच न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे अॅड. हृषिकेश जोशी यांनी सांगितले.