पनवेल : प्रतिनिधी
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन व इतर सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आणि रोटरी ब्लड बँक यांच्या सहकार्याने पनवेलमध्ये शनिवारी (दि. 9) बकरी ईदनिमित्त खांदा कॉलनीत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक कालसुसंगत व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेवून बकरी ईदनिमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय म्हणून त्या दिवशी सर्वात श्रेष्ठ, असे रक्तदान करण्याचे आवाहन सर्व समविचारी संस्थांकडून केले जात आहे. खांदा कॅालनी येथील सेक्टर 1 मधील रोटरी ब्लड बँकमध्ये हे रक्तदान शिबिर सकाळी 9.30 दुपारी 3 या वेळेत ठेवण्यात आलेले आहे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती शाखा पनवेल, सर्वोदय, हुसेनी फाऊंडेशन, राष्ट्र सेवा दल, ग्रामस्वराज्य समिती महाराष्ट्र, ग्राममित्र, ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था, कुष्ठरोग निवारण समिती शांतीवन, युसुफ मेहेरअली सेंटर, तारा, मिशन माणुसकी, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन व इतर संस्थांकडून मुस्लीम बांधवांसमवेत आपण ही ईद सगळे धर्म-जाती पलीकडे, मानवतेसाठी साजरी करू या, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नासीर शेख (7021707827), अल्लाउद्दीन शेख (8080454555), सिद्धेश (9870911911), नाजुका (8976871381) या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.