Breaking News

रायगड विकासाची गाथा लिहिणार -पंतप्रधान नरेंद्र मोदी

खारघरमध्ये महायुतीची भव्य सभा

पनवेल : रामप्रहर वृत्त
विमानतळ, अटल सेतू, सेमी कंडक्टर, डेटा व एआय केंद्र अशा विविध प्रकल्पांच्या अनुषंगाने रायगड जिल्हा विकासाची गाथा लिहिणार आहे आणि पनवेलसह रायगड भविष्यातील विकासाचे केंद्र बनणार आहे. त्यामुळे या ठिकाणी लाखोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत, असे आश्वासक प्रतिपादन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 14) खारघर येथे केले. ते महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित विशाल सभेत मार्गदर्शन करीत होते.
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्षाचे उमेदवार मंत्री रवींद्र चव्हाण (डोंबिवली), आमदार संजय केळकर (ठाणे शहर), आमदार प्रशांत ठाकूर (पनवेल), आमदार गणेश नाईक (ऐरोली), आमदार महेश बालदी (उरण), आमदार मंदा म्हात्रे (बेलापूर), आमदार रविशेठ पाटील (पेण), आमदार महेंद्र थोरवे (कर्जत) यांच्या प्रचारार्थ खारघरच्या सेंट्रल पार्कशेजारील कॉर्पोरेट मैदानावर भव्य विजय संकल्प सभा झाली.
व्यासपीठावर उमेदवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, प्रकल्पग्रस्तांचे झुंझार नेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रभाकर कांबळे, भाजपचे पनवेल विधानसभा संयोजक व जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करून जय भवानी जय शिवाजी अशी गर्जना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमीला मी हृदयपूर्वक नमस्कार करतो. माझे सौभाग्य आहे की पुन्हा मला रायगडकरांना नमस्कार करण्याची संधी मिळाली. रायगडसोबत माझे भावात्मक आत्मिक संबंध आहेत. 2013मध्ये माझे नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर झाले तेव्हा मी रायगड किल्ल्यावर गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ बसून जसा भक्त देवाच्या समोर बसतो तसा मी बसलो आणि महाराजांचे आशीर्वाद घेतले. त्याचप्रमाणे अलिकडे गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन करायला गेलो. तिथे परेडमध्ये रायगडच्या किल्ल्याची प्रतिकृती होती, असे सांगत रायगडचा गौरव दूरवर पोहचला असल्याचे पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केले.
आजची गर्दी बघून 23 तारीखला निकाल काय येणार याची गॅरंटी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात महायुती आहे, तरच गती आहे. महाराष्ट्राची प्रगती आहे असा आवाज येतो. लोकनेते दि.बा. पाटील यांना अभिवादन करतो. त्यांचा त्याग आणि परिश्रम महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात आणखी ऊर्जा देत असल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. शिवरायांनी आम्हाला स्वराज्याची शपथ दिली होती. आता स्वराज्याबरोबरच सुराज्य पुढे घेऊन जाण्याची गरज आहे, असेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, मुंबईत आज अटल सेतू बनला. त्यामुळे रायगडहून मुंबईला जाणे पूर्वीपेक्षा सुलभ झाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर, समृद्धी महामार्ग, मुंबई कोस्टल हायवे, पनवेल-कर्जत रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण यासारख्या कामांमुळे महाराष्ट्राचे चित्र बदलत आहे. रायगड विकासाची नवी व्याख्या लिहितोय. आशियातील दुसरा सर्वात मोठा डेटा पार्क बनतोय. एआय केंद्र रायगडात बनणार आहे. पनवेलमध्ये सेमी कंडेक्टर क्षेत्रात मोठी गुंतवणूक येतेय. पालघर, जेएनपीटी पोर्टने विकासाचे नवीन मार्ग उघडणार आहेत. पनवेल, रायगड, पालघर ही क्षेत्रं भविष्यात नवीन केंद्र असतील. त्यातून राज्यातील लाखो युवकांना रोजगार उपलब्ध होतील. याशिवाय कोकणात तीन नवे बंदरे विकसित होत आहेत. विकसित भारताचे प्रमुख इंजिन महाराष्ट्र बनेल. हा संपूर्ण परिसर समुद्र किनारी आहे. त्यामुळे कोस्टल इकोनॉमीवर सरकार काम करत आहेत.
देशाच्या विकासाचा संकल्प भाजप आणि महायुती सरकारने केला आहे. काँग्रेसने फक्त गरिबाला गरीबच बनवून ठेवले आहे. गरिबी हटावचा खोट्या घोषणा देत काँग्रेसने दिवस घालवले. त्यांनी गरिबांना लुटले. गरीब या संकटातून बाहेर आला नाही. स्वातंत्र्यांच्या 70 वर्षानंतरही अन्न, वस्त्र आणि निवारा यासाठी गरीब लोक तरसत होते, पण पहिल्यांदा भाजपप्रणित सरकारने 25 हजार कोटी जनतेला गरिबीच्या दरीतून बाहेर काढले आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, आम्ही पक्की घरे आणि सुरक्षा गरिबांना दिली. शौचालय बांधून देण्याच काम केले. जलजीवन मिशन अंतर्गत जनतेच्या घरात पाणी पोहचवले. आज सगळ्यांकडे बँक खाते आहे. मजूरही आज युपीएयने पेमेंट करतो. गरीब माणूस स्वतः पुढे जातोय, देशाला पुढे नेतोय. या सगळ्या योजनांचा सगळ्यात मोठा लाभ दलित, आदिवासी आणि मागासलेल्या व्यक्तीला झाला आहे.
जी कामे 10 वर्षात झाली ती याआधीही होऊ शकली असती, पण गरीब पुढे येऊन आपला हक्क मागू नये ही मानसिकता काँग्रेसची होती. आम्ही देशातील 80 कोटी जनतेला दर महिना मोफत रेशन देतो. रायगड जिल्ह्यात 18 लाख कुटुंबांना त्याचा लाभ होतोय. या कामाला कुणाला विरोध असावा का? गरिबाच्या घरात चूल पेटली तर आनंद होणार की नाही?, पण काँग्रेसला आनंद होत नाही. गरिबी रेषेतून 25 कोटी बाहेर निघालेत, त्यांना मोफत रेशन का दिले जाते, असे काँग्रेस विचारते. जर महाविकास आघाडीला संधी मिळाली तर ते महाराष्ट्रात सर्व लाभ बंद करतील. खुलेआम त्यांचा एक नेता म्हणतोय जे रोहिंग्या आहेत त्यांना स्वस्तात गॅस देणार आहेत. काँग्रसला थांबवण्याची मोठी जबाबदारी गरिबांवर आहे, असे पंतप्रधान मोदींनी नमूद केले.
या वेळी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेस नेहमीच आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. देशाचा विकास त्यांना नेहमीच खूपत आला आहे. समाजांमध्ये फूट पाडणे आणि सत्ता काबीज करणे हेच त्यांचे आजवरचे धोरण राहिले आहे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गांमधील समाजांना फोडण्याचा षडयंत्र काँग्रेसने रचले आहे, परंतु आम्ही त्यांना यामध्ये यशस्वी होऊ देणार नाही. काँग्रेसचे नेते परदेशांमध्ये जातात आणि खुलेआम घोषणा देतात की, आम्ही आरक्षण संपवून टाकू. आता ते महाविकास आघाडीतील पक्ष महाराष्ट्रातील छोट्या छोट्या जातींमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहेत, जेणेकरून त्या छोट्या जातींची, समुदायांची राजकीय शक्ती कमी व्हावी आणि ठराविक लोकांनाच सत्तेचा मलिदा मिळावा. काँग्रेसने नेहमीच सत्ता मिळवण्यासाठी समाजा-समाजांचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला आहे. विकासाऐवजी फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती राहिली आहे, याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष वेधले.
आज भारत प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे नवे रेकॉर्ड बनवत आहे. देशात महिलांना पुढे नेण्यासाठी सरकार महिला सशक्तीकरणाचे धोरण अवलंबत आहे. आमच्या सरकारने पीएम आवास योजना आणली. या घरांची नोंदणी घरातील महिलेच्या नावावर व्हावी असे धोरण आम्ही आणले. आम्ही देशात घरोघरी शौचालय उभारली. काँग्रेसने त्याची खिल्ली उडवली, परंतु महिला सन्मानासाठी ही योजना आम्ही आणली. तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवण्याच्या योजनेवर आम्ही काम करतोय. इतक्यावर न थांबता प्रत्येक वर्षी महिलांचे आर्थिक उत्पन्न एक लाख रुपयांहून अधिक बनवण्याचे माझे स्वप्न आहे. महाराष्ट्रात महायुती सरकार महिलांना दुप्पट लाभ देत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या सरकारने आणली, मात्र काँग्रेस आणि आघाडीवाले बहिणींना मिळणार्‍या योजनेचा विरोध करत आहेत. यांचे लोक ही योजना थांबवण्यासाठी कोर्टापर्यंत गेले. यावरून आघाडीवाल्यांचा हेतू किती धोकादायक आहे याचा विचार करा. भविष्यातील महिलांची प्रगती रोखण्याचा आघाडी प्रयत्न करत आहे, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला आहे.
देशातील प्रत्येक नागरिकाने एकसंघ राहिले पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही फक्त आमदार नाही, तर महाराष्ट्राचा विकास निवडणार आहात. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
या वेळी महायुतीचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अटल सेतू आणि मेट्रोच्या कामाला स्थगिती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केले, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी याकडे विशेष लक्ष देत हे प्रकल्प पूर्णत्वास नेले आणि या प्रकल्पांचा वाहतुकीच्या दृष्टीने नागरिकांना मोठा फायदा होत आहे. विविध योजना आणि प्रकल्पामुळे हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित झाला असून महायुती सरकारच्या कामगिरीचा सर्वांना अभिमान आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाची शपथ घेण्यापूर्वी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होऊन निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका लावला आणि विजयाचा इतिहास घडवला. 20 नोव्हेंबरला प्रत्येक मतदाराने मतदानाचा अधिकार वापरायचा आहे. 10 वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासाचा आलेख उंचावला आहे. विमानतळ, कॉरिडोर, कोस्टल रोड, अटल सेतू, रस्त्यांचे जाळे निर्माण झाले. जलजीवन योजना आणून पाण्याचा प्रश्न निकाली लागला. लोडशेडिंग बंद झाले. मेट्रो सुरू झाली. गरजेपोटी घरे नियमित करण्याचा निर्णय झाला, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधोरेखित केले.
पनवेल महापालिकेच्या मालमत्ता करासंदर्भात विरोधकांनी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला, न्यायालयात गेले. हेच विरोधक महाविकास आघाडीवाले सत्तेत होते त्या वेळी मालमत्ता कराबाबत का निर्णय घेऊ शकले नाही, असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी उपस्थित केला तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्याचा घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांचे आभार मानले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रचार सभेतील विचार ऐकण्यासाठी पनवेल, उरण आणि नवी मुंबईसह, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील विविध मतदारसंघातून भाजप महायुतीचे हजारो कार्यकर्ते गुरुवारी खारघर उपनगरामध्ये दाखल झाले. त्यामुळे खारघरमधील वातावरण मोदीमय झाले होते. वंदे मातरम, जय श्रीराम अशा विविध घोषणा देत हे कार्यकर्ते सभेस्थळी येत होते. त्यामुळे एक वेगळाच उत्साह दिसून आला. दरम्यान, 25 हजार कार्यकर्ते एकाच ठिकाणी जमणार असल्याने कार्यकर्त्यांच्या आरोग्यसेवेच्या दृष्टीने वैद्यकीय मदत कक्ष अनेक ठिकाणी उभारण्यात आले होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply