Breaking News

रायगडात पावसाचा जोर कायम; पोलादपूरमध्ये एनडीआरएफचे पथक दाखल

महाड : प्रतिनिधी
संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात रायगड जिल्ह्यामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाचा जोर बुधवारी (दि. 6)देखील कायम होता. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाली असून एनडीआरएफचे महाडमध्ये आलेले आणखी एक पथक पोलादपूर येथे पाचारण करण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे महाडकर नागरिकांमध्ये भय निर्माण झाले असतानाच सोमवारी महाड शहर परिसरात विविध ठिकाणी पुराचे पाणी शिरले होते. यामुळे सन 2021च्या स्मृती जाग्या झाल्या. महाडसह शेजारील भोर (पुणे), आणि महाबळेश्वर भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने याचे पाणी थेट सावित्री, काळ, आणि गांधारी नद्यांमध्ये येऊन मिळत आहे. त्यातच खाडीला येणारी भरती आणि त्यातून उद्भवणारा पूर यामुळे शहरातील वातावरण आणखी भीतीयुक्त बनत चालले आहे.
या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या दोन तुकड्या रायगड जिल्ह्यात यापूर्वीच दाखल झाल्या असून यातील एक पथक पेण येथे, तर दुसरे महाडमध्ये दाखल झाले आहे. बुधवारी पुन्हा पुणे येथून एक पथक महाडमध्ये दाखल झाले. या पथकाची नेमणूक पोलादपूर या ठिकाणी करण्यात आली आहे.
महाडमध्ये आलेल्या पथकात श्वान पथकदेखील दाखल झाले आहे. एनडीआरएफच्या तीन पथकांत जवळपास 80 जवानांचा समावेश असून उपविभागीय अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार आमचे पथक त्या त्या आपत्तीनुसार काम करेल आणि नागरिकांचा जीव वाचविण्याचे काम करेल, असे या पथकाचे प्रमुख विजय चौहान यांनी सांगितले.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply