Breaking News

उद्धव ठाकरेंनी प्रति’मातोश्री’ तयार केली : आ. भरत गोगावले

मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरे यांनी प्रति‘मातोश्री’ तयार केली आहे त्यामुळे त्यांच्या मातोश्रीवर आम्ही जाऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे आणि नव्या सरकारसंदर्भात भाष्य केले.
आमदार गोगावले म्हणाले, ‘मातोश्री’ हे ठिकाण बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. ‘मातोश्री’ उभी कोणी केली तर त्यांनीच. उद्धव ठाकेरंनी त्याच्यासमोर आता नवी ‘मातोश्री’ तयार केली आहे. बाळासाहेबांची ‘मातोश्री’ तीन मजल्यांची आणि उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ आठ मजल्यांची आहे. त्यामुळं आम्हाला आठ मजले चढता येणार नाहीत केवळ तीन मजले आम्ही चढून जाऊ शकतो.
शिवसेनेचे खासदार आणि नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत का या प्रश्नावर बोलताना आमदार गोगावले म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच ब्रीदवाक्य घेऊन पुढे चाललेलो आहोत. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे सभागृहात सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार आणि छोटे पदाधिकारी शिंदे यांच्या संपर्कात आहेत की नाही हे त्यांनाच माहिती आहे, परंतु खासदार राहुल शेवाळे यांनी काल जे सांगितले त्यावरून तुम्हाला कल्पना यायला पाहिजे.
संजय राऊत काय बोलत आहेत याचे परिणाम काय होत होते हे माध्यमांना चांगले माहिती आहे. आमचे 40 जण आणि 10 अपक्ष अशा 50 जणांनीदेखील हेच सांगितले आहे की, संजय राऊत यांनी काय केलेय. राऊतांमुळंच आमच्यावर बंडखोरीची वेळ आली, असा गंभीर आरोपही या वेळी आमदार गोगावले यांनी केला.
‘संजय राऊतांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली’
मुंबई ः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली होती, असा गंभीर आरोप माजी गृहराज्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार शंभुराज देसाई यांनी नाव न घेता केला आहे. शिवसेनेचे आमदार वारंवार याबाबत उद्धव ठाकरेंना सांगत होते, पण त्यांनी ऐकले नाही, असेही देसाई यांनी म्हटले आहे. ‘आमचे अनेक नेते सांगतात की, कोणीतरी उद्धव ठाकरेंच्या जवळ असणार्‍या मोठ्या व्यक्तीने शिवसेना संपवण्याची सुपारी घेतली. त्याचे परिणाम गेल्या अडीच वर्षांत दिसून आले आहेत. शिवसेनेचे 55 पैकी 40 आमदार एका बाजूला गेले आहेत. हा ट्रेण्ड हळूहळू खालपर्यंत जाणार आहे, पण या आमदारांचे का बरे ऐकले गेले नाही? कुणाच्या सल्ल्यामुळे ऐकले गेले नाही? कोणाच्या सांगण्यामुळे ऐकले गेले नाही? नेत्यांनी आता हा विचार केला पाहिजे की, हे 40 लोक आपल्याला जे सांगत होते त्यात आता तथ्य आढळून आले आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply