मुरूड : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात प्राण्यांबरोबरच पक्ष्यांचीही संख्या वाढत असून, नुकत्याच केलेल्या गणनेत पक्ष्यांच्या 190 प्रजाती या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत.
सन 1986मध्ये अधिसूचित करण्यात आलेले मुरूडमधील फणसाड अभयारण्य 54 चौकिमी क्षेत्रफळात पसरलेले असून, मुरूडच्या नबाबाचे हे शिकारीसाठीचे राखीव जंगल असल्याने अन्य मानवी हस्तक्षेपापासून ते आजही सुरक्षित राहिले आहे. वन विभाग आणि ग्रीन वर्क ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने फणसाड अभयारण्यामध्ये नुकतेच तीन दिवसीय पक्षी निरीक्षण व गणनेचे आयोजन करण्यात आले होते.
लाईन ट्रान्सेक्ट आणि पॉइंट काऊंट या शास्त्रीय पद्धतीने पक्षीगणना झाली. या गणनेसाठी देशभरातील 130 लोकांनी नोंदणी केली होती. त्यातून 41 लोकांची निवड करून त्यांचे 11 गटांमध्ये विभाजन करण्यात आले आणि एकूण 17 लाइन ट्रान्सेक्ट आणि एक पॉइंट काऊंटचा वापर करून त्यांनी तीन दिवसांत मोहीम फत्ते केली. प्रत्येक गटासोबत एक पक्षीतज्ज्ञ, ग्रीन वर्क्स ट्रस्टचा स्वयंसेवक व एका वनरक्षक होता.
वन्यजीव विभाग ठाणे येथील उपवनसंरक्षक डॉ. भानूदास पिंगळे, सहाय्यक वनरक्षक कुपते, वनपरिक्षेत्र अधिकारी राजवर्धन भोसले, ग्रीन वर्क्स ट्रस्टचे निखिल भोपळे यांच्या उपस्थितीत उपक्रम यशस्वी झाला.
फणसाड अभयारण्यातील पक्षीगणनेत सर्व टीमने केलेली मेहनत वाखणण्याजोगी होती. हेच निकष वन्यजीव गणनेसाठी वापरणार आहोत व पुढे औषधी वनस्पतींची गणनाही करणार आहोत.
-राजवर्धन भोसले, वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड अभयारण्य