नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा
कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी नवी मुंबई येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांचे जिम, उद्याने व जलतरण तलाव पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सिडकोतर्फे सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व गृहनिर्माण संस्थांमध्ये कोणत्याही कार्यक्रमानिमित्त मोठी गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशदेखील सिडकोतर्फे देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा संसर्ग, प्रसार व लागण गर्दीच्या ठिकाणी जास्त होते. गृहनिर्माण संस्थांच्या जिम, उद्याने व जलतरण तलावाच्या ठिकाणी अशाच प्रकारे गर्दी अथवा लोकांचा समूह निर्माण होऊन त्याद्वारे संसर्ग, प्रसार अथवा लागण होण्याची मोठ्या प्रमाणावर शक्यता असल्याने पुढील सूचनेपर्यंत नवी मुंबईतील गृहनिर्माण संस्थांना त्यांचे जिम, उद्याने व जलतरण तलाव बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूची लागण म्हणजेच उजतखऊ-19 या रोगाला पॅनडेमीक (जगभरात पसरलेला साथीचा रोग) घोषित करण्यात आले असून ही एक प्रकारची राष्ट्रीय आपत्तीच आहे. त्यामुळे सिडकोतर्फे नवी मुंबई येथील सहकारी गृहनिर्माण संस्थांना देण्यात आलेल्या वरिल निर्देशांचे त्यांनी काटेकोर पालन करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन सदर संस्थांना करण्यात येत आहे. त्याच बरोबर नवी मुंबईतील सर्व नागरिकांनादेखील आवाहन करण्यात येते की त्यांनी सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे कटाक्षाने टाळावे. आपणा सर्वांच्या सहकार्यातूनच या राष्ट्रीय आपत्तीचा सामना करणे शक्य होणार आहे.