अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग विभागातील आठ पूल कमकूवत आहेत. यापैकी दोन पुलांचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. सहा ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येणार आहेत. तालुक्यातील खडताळ पूलाला पर्यायी नवीन पूल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अलिबाग विभागात 44 लहान आणि 25 मोठे असे एकूण 69 पूल आहेेत. त्यापैकी 13 पूलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात आले आहे. त्यात आठ पूल कमकुवत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रेवदंडा, एकदरा, खडताळ, सहाण, पाले, नवेदरबेली, आवास आणि सासवणे हे पूल कमकूवत झाले आहेत. त्यापैकी रेवदंडा व एकदार या पुलांचे मजबूतीकरण करण्यात येणार आहे. अलिबाग-रेवस मार्गावरील खडताळ पूलाला पर्याय म्हणून नवीन पूल बांधण्यात येणार आहे. आवास, सासवणे, सहाण, पाले, नवेदरबेली येथेदेखील नवीन पूल बांधण्यात येणार आहे, अशी माहिती जगदीश सुखदेवे यांनी दिली. काही पूल कमकूवत झाले आहेत, त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे सुखदेवे यांनी सांगितले.