अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत मापगावमध्ये पहिले दल स्थापन
अलिबाग : प्रतिनिधी
कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलीस यंत्रणा करीत असली तरी ती प्रत्येक गावाला सुरक्षा देऊ शकत नाही. त्यामुळे आपले गाव सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तरुणांनी उचलणे महत्त्वाचे आहे. यासाठी पोलीस विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत ग्रामरक्षक सुरक्षादल स्थापन केले जात आहे. हे दल गावात पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणार आहे. अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत ग्रामरक्षक सुरक्षादल स्थापन करण्याचा पहिला मान हा मापगाव गावाला मिळाला आहे. गावातील पंधरा होतकरू तरुण या दलात सहभागी झाले आहेत.
मापगाव ग्रुपग्रामपंचायत कार्यालयात अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस याच्या हस्ते ग्रामरक्षक सुरक्षा दलातील पंधरा सदस्यांना ओळखपत्र आणि टी-शर्टचे वाटप करण्यात आले. मापगाव सरपंच उनिता थळे, मापगाव पोलीस पाटील, बहिरोळे पोलीस पाटील, माजी सरपंच सुनील थळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. ग्रामरक्षक सुरक्षा दलाची कर्तव्ये याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून आपत्ती कालावधीत नेहमी सतर्क राहून पोलीस ठाण्याच्या संपर्कात राहण्याबाबतच्या सूचनापोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी या दलाला दिल्या आहेत.
ग्रामरक्षक सुरक्षा दल हे गावाच्या सुरक्षेबाबत काम करणार आहे. नैसर्गिक आपत्ती काळात हे दल बचाव, मदत कार्यात सहभागी होईल. गावातील गुन्ह्याबद्दल पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करतील. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी या दलाचे सदस्य मदतीसाठी पुढे येतील. त्यामुळे गावाची सुरक्षा या दलाच्या माध्यमातून केली जाणार असून पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून ते काम करतील. अशी माहिती शैलेश सणस यांनी या वेळी दिली. प्रत्येक गावात ग्रामरक्षक सुरक्षा दल स्थापन करण्यासाठी तरुणाईने पुढे येण्याचे आवाहनही पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी केले आहे.