मोहोपाडा : प्रतिनिधी
रोटरी वर्ष 2022-2023साठी रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा, मानद सचिव रो.डॉ.धीरज जैन आणि संचालक मंडळ यांचा पदग्रहण समारंभ माँटेरिया रिसॉर्ट, विणेगाव येथे झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल मोहन पालेशा आणि सहाय्यक प्रांतपाल अविनाश कोळी उपस्थित होते.
या वेळी रोटरी वर्ष 2021-22चे माजी अध्यक्ष गणेश काळे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष अमित शहा यांना अध्यक्षपदाची सूत्रे, तर माजी सचिव संदीप साबळे यांनी नवनिर्वाचित सचिव डॉ. धीरज जैन याना सचिवपदाची सूत्रे प्रदान केली. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर केलेल्या आपल्या समयोचित भाषणात अमित शहा यांनी क्लबच्या माध्यमातून करावयाच्या नियोजित समाजसेवी प्रकल्पांचे सादरीकरण केले. डॉ. धीरज जैन यांनी 1 जुलैपासून झालेल्या चार प्रकल्पांची माहिती दिली. ज्यात मोहोपाडा तलावाच्या बाजुला केलेले 35 वृक्षांचे रोपण, 66 रक्तपिशव्यांचे संकलन झालेला प्रायमाच्या व संपूर्ण रेगे हॉस्पिटलच्या मदतीने झालेले रक्तदान शिबिर, 25 वर्षांपेक्षा अधिक वैद्यकीय सेवा दिलेल्या रसायनी-पाताळगंगा परिसरातील 11डॉक्टरांचा सन्मानपत्र देऊन केलेला सत्कार आणि अमितच्या वाढदिवशी मोहोपाड्यातील दोन प्राथमिक शाळांमधील 95 विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंच्या संचांचे वाटप करण्यात आल्याच्या प्रकल्पांचा समावेश होता.
रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या ’पाताळगंगा फ्लोज’ या वार्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले ज्याचे संपादन बाळकृष्ण होनावळे व ज्याची निर्मिती माजी अध्यक्ष नागेश कदम यांनी केले. तसेच या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी अध्यक्ष सुनील कुरूप यांनी केले.