Breaking News

भारत अवकाश सत्ता!

एका अर्थाने भारत 27 मार्च 2019 या दिवशी ‘जागतिक अवकाश महासत्ता’ ठरला आहे. अशी ऐतिहासिक कामगिरी घडवण्यासाठी जे समर्थ नेतृत्व हवे, ते मोदी यांच्या ठायी आहे. त्यामुळेच की काय विरोधकांना ही घडामोड फारशी सुखावणारी ठरलेली नसावी. शांततेसाठीच भारत या क्षमतेचा वापर करील, असा ठाम विश्वास पंतप्रधान मोदी यांनी जगाला दिला आहे.

निवडणुकीच्या धामधुमीत एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक चालू असताना देशाची वाटचाल अत्यंत दिमाखदारपणे अव्याहत सुरूच राहावी याची दक्षता पंतप्रधान नरेंद्र मोदी किती समर्थपणे घेत आहेत याचे दर्शन देशवासीयांना बुधवारी घडले. तूर्तास फक्त आणि फक्त राजकारणाच्या बातम्यांचे गुर्‍हाळ लावून बसलेल्या प्रसारमाध्यमांना भारतीय शास्त्रज्ञांनी एक आगळीच, भुवया उंचावणारी बातमी दिली. ही बातमी होती, पृथ्वीच्या निम्नकक्षेत स्थिरावलेला एक उपग्रह अवकाशातच नष्ट करण्याची क्षमता इस्रोच्या वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांनी मिळवल्याची! अवकाशातील एक उप्रगह वरच्या वरच नष्ट करण्याची ही क्षमता प्राप्त करणे हे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक आणि राजकीय वर्तुळात आत्यंतिक महत्त्वाचे आहे. कारण आजच्या घटकेला या प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया आणि चीन या तीनच देशांना प्राप्त करता आले आहे. चीनने 2007 मध्येच ही क्षमता कमावली. तरीही, अन्य कुठल्याही विकसित देशाच्या आधी भारताने या महासत्तांच्या जोडीला जाऊन बसणे हे निश्चितच अनेकांना आ वासायला लावणारे व देशवासीयांसाठी आत्यंतिक अभिमानास्पद आहे. भारतीय शास्त्रज्ञ आणि संरक्षण तज्ज्ञ यांच्या निवडक चमूने अवकाशातील शस्त्राच्या वापराची ही अवघड कामगिरी बुधवारी सकाळी अवघ्या तीन मिनिटांत, गोपनीयरीत्या पार पाडली. पाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाद्वारे ही आनंद वार्ता भारतीय जनतेपर्यंत पोहोचवली. ‘मिशन शक्ती’ नावाच्या या योजनेत वापरण्यात आलेले तंत्रज्ञान पूर्णत: देशांतर्गत विकसित करण्यात आलेले आहे. पृथ्वीपासून तीनशे किमी अंतरावर अवकाशात हिंडणारा उपग्रह अवघ्या तीन मिनिटांत उद्ध्वस्त करणे ही अर्थातच सोपी गोष्ट नव्हे. भारताने सिद्ध केलेल्या या नव्या सामर्थ्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर व विशेषतः आपल्या शेजारी राष्ट्रांना निश्चितच घ्यावी लागेल. जगभरातील सर्वच देशांतील अनेक यंत्रणा आता अवकाशातील उपग्रहांवर अवलंबून असल्यामुळे भविष्यातील युद्धे ही अवकाश युद्धेच असणार आहेत. अशा परिस्थितीत शत्रूराष्ट्रांचे आपल्यावर रोखलेले, हेरगिरी करणारे वा क्षेपणास्त्रांना दिशा दाखवणारे उपग्रह अवकाशातच नष्ट करण्याची क्षमता भारताने प्राप्त करणे किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको. पंतप्रधानांना या निमित्ताने तासभर मोफत राष्ट्रीय टेलिव्हिजनवर झळकायला मिळाले, अशी हास्यास्पद प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी व्यक्त केली, तर काहींनी निवडणूक आचारसंहिता लागू असताना हे कसे काय, असा सूर लावला. काँग्रेसने नेहमीप्रमाणे इथेही नेहरू आणि इंदिरा गांधी यांचाच उदो उदो केला. मे 1998 मध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने पोखरण येेथे अणुस्फोट घडवून जगाला हादरा दिला होता. त्यापाठोपाठ भारतावर जागतिक निर्बंधही लादले गेले. आताची ‘मिशन शक्ती’ ही योजना कोणाच्याही विरोधात नाही. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ही प्रगती, हे ऐतिहासिक पाऊल प्रत्येक भारतीयाला सुरक्षित वाटावे यासाठी आहे.

Check Also

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ

स्पर्धा प्रमुख परेश ठाकूर यांची जळगाव केंद्रावर उपस्थिती जळगाव ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर …

Leave a Reply