नगरपालिका मुख्याधिकार्यांना निवेदन
खोपोली : प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका प्रशासनाने नुकताच पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, याबाबत विविध वर्तमानपत्रात पाणीपट्टी दरवाढीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. खोपोली भारतीय जनता पक्षाने या पाणीपट्टी वाढीस तीव्र विरोध दर्शवला असून, ही पाणीपट्टी वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी, अशी मागणी खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्याकडे सोमवारी (दि. 11) निवेदनाद्वारे केली.
कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून नागरिक त्रस्त झाले असून, त्यामुळे अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. अनेकांनी नोकर्या गमावल्या, अनेक संसार रस्त्यावर आले तर व्यवसायीक आजही आर्थिक संकटातून अजूनही सावरलेले नाहीत. अशा परिस्थितीत पाणीपट्टी वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. तो अयोग्य आहे त्याचा नगरपालिका प्रशासनाने फेर विचार करावा, असे भाजप तर्फे देण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
खोपोली भारतीय जनता पक्ष सरचिटणीस हेमंत नांदे, महिला मोर्चा शहराध्यक्ष शोभाताई काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, युवामोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुलकर, वैद्यकीय सेलचे विकास खुरपडे, सागर काटे यांच्यासह इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. निवेदन स्वीकारून मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी, पाणीपट्टी वाढीबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याचे नांदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.