Breaking News

कर्जतमध्ये एनएमएनटीच्या बसेस थांबतात रस्त्यावर

कर्जत : बातमीदार

एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरु असताना प्रवाशांच्या सेवेसाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आपली परिवहन सेवा (एनएमएनटी) कर्जतपर्यंत सुरू केली. मात्र एनएमएनटीच्या बसेस उभ्या करण्यासाठी त्यांना कर्जतमध्ये हक्काची जागा (स्थानक) नाही. परिणामी त्या बसेस एसटी आगाराबाहेर रस्त्यावर थांबत असल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे.

कोरोना काळात कर्मचार्‍यांनी संप केल्याने कर्जत एसटी आगार बंद पडला होता. त्यावेळी स्थानिक प्रवाशांच्या मागणीनंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने बेलापूर-कर्जत बस सेवा सुरु केली होती. त्यावेळी एनएमएनटीच्या बस एसटीच्या कर्जत आगारात उभ्या रहात होत्या व तिथूनच त्या सुटत होत्या. त्यामुळे कर्जत-पनवेल मार्गावरील प्रवाशांना एनएमएमटीच्या बसचा उपयोग करता आला.

दरम्यान, कर्मचार्‍यांचा संप मिटल्यानंतर कर्जत एसटी आगार पुर्ण क्षमतेने सुरु झाला. त्यामुळे आगार व्यवस्थापक एनएमएमटीच्या बस एसटी स्थानकात  उभी करून देत नाहीत. त्यामुळे एनएमएमटीचे चालक नाईलाजास्तव आपल्या बस कर्जत एसटी आगाराबाहेर रहदारीच्या रस्त्यावर उभ्या करीत आहे.

एनएमएमटीच्या बसेसना कर्जत शहरात गाड्या उभ्या करण्यासाठी आणि काही वेळ थांबण्यासाठी हक्काची जागा नाही. या गाड्या भिसेगाव-गुंडगे रस्त्यावर थांबत आहेत. हा रस्ता रहदारीचा आहे. नागरिक बाजारहाट तसेच रेल्वे पकडण्यासाठी, विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. एनएमएमटी बसेस या रस्त्यावर उभ्या रहात असल्याने वाहतुकीला अडसर होत असून अपघात होण्याची शक्यता वाढली असल्याने एनएमएमटीच्या बसेस एसटी स्थानकात  उभ्या कराव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी तसेच कर्जत पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेने लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply