अलिबाग ः प्रतिनिधी
नोंदणी केलेल्या गृहनिर्माण संस्थेचा प्रलंबित निकाल देण्याकरिता 40 हजार रुपयांची लाच घेताना रायगड जिल्हा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे आणि त्यांच्या कार्यालयातील मुख्य लिपीक सुहास दवटे यांना रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.
रोहा तालुक्यातील अष्टमी येथील माऊली इन्क्लेव्ह गृहनिर्माण संस्थेच्या बिल्डरने सोसायटी करून दिली नव्हती. गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी सभासदांनी अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात जिल्हा उपनिबंधक याच्याकडे अर्ज केला होता. जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे यांच्याकडे हा अर्ज आला होता. त्याचा निकाल प्रलंबित ठेवण्यात आला होता. 23 सप्टेंबर रोजी प्रलंबित प्रकरणाची पडताळणी करण्यादरम्यान मावळे आणि दवटे यांनी संस्थेच्या सभासदांकडे 40 हजार रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम देण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी तक्रारदार सभासद सोसायटीचे सभासद सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक कार्यालयात आले.
तक्रारदार यांनी मावळे आणि दवटे यांनी मागितलेल्या लाचेबाबत लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अलिबाग येथील सहकारी संस्था कार्यालयात सापळा रचून मुख्य लिपीक सुहास दवटे यांना 40 हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. दवटेसह मावळे यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले असून 28 सप्टेंबर रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …