Breaking News

नामांतरावर आज अधिकृत निर्णय

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई ः प्रतिनिधी

ठाकरे सरकारने राज्यातील दोन शहरे आणि विमानतळ नामांतराबाबत घेतलेले निर्णय हे सरकार जेव्हा अल्पमतात तेव्हा घेतले होते. त्यामुळे ते निर्णय बेकायदेशीर असून आम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये अधिकृतपणे याबाबत निर्णय घेणार आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी (दि. 15) दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यास दुजोरा दिला आहे. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या अनेक नेतेमंडळींनी हा निर्णय हिंदूविरोधी असल्याचे म्हटले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या नामांतर आणि नामकरणाच्या निर्णयावर उद्याच्या कॅबिनेटमध्ये शिक्कामोर्तब करणार आहोत. औरंगाबादचे नाव संभाजीनगर हे बाळासाहेबांचे स्वप्न आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार आहोत. नामांतर करण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. सरकार अल्पमतात असताना दोनशे-तीनशे जीआर काढले. ज्या कॅबिनटमध्ये निर्णय घेतले तीच बेकायदेशीर होती. त्यामुळे उद्या अधिकृत कॅबिनेट घेऊन नामांतरावर शिक्कामोर्तब करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेत बोलताना दिली. संभाजीनगर हे नाव बाळासाहेबांच्या मुखातून निघालंय, त्याला स्थगिती देणार नाही. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव होणारच. आम्ही हिंदुत्ववादी असलो तरी अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेतेही आमच्यासोबत आहेत, कारण आम्ही मुस्लिम, शीख, इसाई यांचा अनादर करीत नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बंडखोरी करण्याबाबतच्या निर्णयावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी या वेळी मत व्यक्त केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना वाचविण्यासाठी मी हा निर्णय घेतला. ही भूमिका सगळ्यांना न्याय देणारी आहे. पंढरपूरला जाताना पुण्याच्या रस्त्यावर लोक माझे स्वागत करीत होते. लोकांच्या भावना बघितल्या, त्यांचा आशीर्वाद घेतला. माझा हे  सगळे करण्यामागे काहीच स्वार्थ नव्हता. एक, दोन नाही तर 50 आमदार माझ्यामागे आहेत. मला मुख्यमंत्री करणार असे सांगत होते, पण मी मुख्यमंत्रिपदासाठी आलोच नव्हतो. आपला पक्ष मोठा करण्यासाठी आणि आपल्या माणसांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे म्हणून मी आलो, असे मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले.

बहुमताने निर्णय घेणार

मुंबई ः उद्धव ठाकरे यांच्या सरकारने अखेरच्या कॅबिनेटमध्ये घेतलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांना शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याची माहिती समोर आली होती, पण या निर्णयांना स्थगिती दिली नसल्याची स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, त्या सरकारला सभागृहात बहुमत नव्हतेच, पण कॅबिनेटमध्येही बहुमत नव्हते. त्यांची काही लोकं एका बाजूने बोलली, तर काही लोकं दुसर्‍या बाजूने बोलली. त्यामुळे नेमका यांचा निर्णय काय होता हे पूर्णपणे अस्पष्ट होते. आजही कोणाच्या मनात काय आहे हे समजू शकत नाही. अनेक लोकं दोन्ही बाजूने बोलत आहेत, पण आमचे निश्चित झाले आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर होईल, उस्मानाबादचे नाव धाराशिव होईल आणि नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल.

Check Also

कर्जतमध्ये तिहेरी हत्याकांड

जमिनीच्या वादातून कुटुंबातील तिघांचा खून; संशयित तरुण पोलिसांच्या ताब्यात कर्जत, नेरळ : प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील …

Leave a Reply