रसायनी : प्रतिनिधी : रसायनी परिसरातील मोहोपाडा येथील आई फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून तालुक्यातील दिव्यांग, कर्णबधीर व मूकबधीर आदींना मदत मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्य सुरू असते. या संस्थेचे अध्यक्ष अनंता दळवी हे स्वखर्चाने दिव्यांगांना अलिबाग जिल्हा आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी करून त्यांना घरपोच दिव्यांग दाखला मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात.
बुधवारी (दि. 8) मोहोपाडा जैन डॉक्टर यांच्या आवारात आई फाउंडेशनच्या वतीने चार दिव्यांगांना दाखले वाटप करण्यात आले. यात राजश्री रमाकांत वाघमारे, गणेश सखाराम वाघमारे, पांडुरंग सीताराम पाटील, समाधान बबन खवळे या दिव्यांगांना आई फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक आनंदा दळवी, कामगार नेते वसंतराव देसाई, महिला सामाजिक कार्यकर्त्या दक्षता महेंद्र भोईर, उपाध्यक्ष तानाजी मोगारे यांच्या हस्ते दाखले वाटप करण्यात आले, तसेच रेखा गोविंद लेले-खोपोली, वंदना बळीराम मांडे-काळणाची वाडी व नवीन पोसरीतील अन्य एक महिला यांना संजय गांधी निराधार योजनेतून दरमहा 600 रुपये पेन्शन मिळवून दिल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. याआधीही आनंदा दळवी यांनी 35 ते 40 निराधार महिलांंना पेन्शन व 50 च्या आसपास दिव्यांगांना मोफत दाखले मिळवून दिले आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याचे संपूर्ण मोहोपाड्यात कौतुक होत आहे.