Breaking News

सततच्या पावसामुळे भातशेतीचे नुकसान

अनेक ठिकाणी रोपे कुजली; शेतकरी हवालदिल

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नदीच्या कडेला असलेल्या भागातील शेतीमध्ये सलग पाच-सहा दिवस पाणी साचून राहिले आणि त्यामुळे रोपे कुजली आहेत. त्यामुळे बळीराजाच्या संकटात भर पडली आहे.

मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दुबार भातपेरणीदेखील शक्य नसल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. लावणीसाठी तयार झालेले भाताची रोपे (राब) वाहून गेली आहेत.

या संकटाची साधी पुष्टीसुद्धा करण्यास अद्याप शासनाचा एकही माणूस शेतकर्‍याच्या बांधावर गेला नाही, तर नुकसानीचे पंचनामे करण्यास कधी येतील? असा प्रश्न पडला आहे.

वेणगाव, वदप, कुशिवली, गौरकांत, जंभिवली, जांबरुख, बारणे, सलोख, तांबस, सावेळे भोईरवाडी, मार्केवाडी, कुंडलज, पोसरी, तिवरे, तमनात, खांडपे, मुळगाव, कोंडीवडे, सापेले, वावे, बेंडसे, चांदई, वडवली, कडाव, पोटल पाली, वैजनाथ, मंडवणे कराले वाडी, भाडीवली, सावरगाव,एकसल, मावगाव, बेकरे, देऊळ वाडी, मालवाडी, कोषाने, पिंगळस, खांडस, नांदगाव, बळीवरे, बोरिवली, सुगवे, नालदे या भागातील भाताच्या शेतीत सतत पाच दिवस पाणी साचून राहिल्याने भातक्षेत्र संकटात आले आहे.

कळंब, भडवल आणि डोंगर भातलावणी पूर्ण झाली आणि त्यात भाताची लागवड केलेली रोपे देखील कुजून गेली आहेत.

नव्याने भाताचे रोपे कोणाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे आमचे नुकसान आमच्या डोळ्यासमोर दिसत आहे, असे पोही येथील शेतकरी दिनेश भोईर यांनी सांगितले आहे.

खूप पाऊस पडत असल्याने शेतकर्‍यांच्या शेतात पाणी जाऊन काही ठिकाणची शेती पाण्याखाली गेली आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले जातील आणि वरिष्ठ कार्यलयाकडे पाठवले जातील.

-शीतल शेवाळे, तालुका कृषी अधिकारी

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply