ठाणे : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. दि. 19 एप्रिल 2019 रोजी विद्यार्थ्यांनी ठाणे मध्यवर्ती कारागृह या भारतातील एका जुन्या कारागृहास भेट दिली.
स्वातंत्र्यपूर्व काळात नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर अधिकारी होता. त्याने अनेक देशभक्तांना कारावासात धाडले होते. सावरकर बंधू, मदनालाल धिंग्रा यांच्याकडून स्फूर्ती घेऊन अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार मारण्याचे ठरविले आणि 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक येथे आयोजित केलेल्या जॅक्सनच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अनंतरावांनी जॅक्सनवर
समोरून चार गोळ्या झाडून त्याच्या क्रूर राजवटीचा अंत केला. पुढे क्रांतिवीर अनंत कान्हेरे, क्रांतिवीर कृष्णाजी कर्वे आणि क्रांतिवीर विनायक देशपांडे यांना या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि 19 एप्रिल 1910 रोजी या तीन क्रांतिवीरांना ठाणे कारागृहात फाशीची शिक्षा देण्यात आली. त्या दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी (दि. 19) तेथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारती जोशी, माजी शिक्षिका, ज्ञानसाधना विद्यालय ठाणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांस या क्रांतिवीरांची माहिती दिली आणि भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या तीन हुतात्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी कारागृहाचे अधीक्षक वायचळ यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहाचे उपअधीक्षक सदाफुले आणि जेलर श्री. सोनावणे यांनी या भेटीचे नियोजन केले. या वेळी जेलर वर्ग 2
नामदेव साबळे, यांनी सर्व विद्यार्थ्यांना सोबत करून कारागृहाची माहिती दिली, तसेच कैद्यांचा दिनक्रम, त्यांना दिले जाणारे अन्न, वैद्यकीय सुविधा, न्यायालयातून आरोपी कारागृहात दाखल करून घेण्याची, तसेच त्यांना न्यायालयात हजर करण्याची कार्यपद्धती या बाबींची माहिती दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कारागृहातील कारखाने म्हणजेच लाकडाच्या वस्तू बनवण्याचा कारखाना, सुतापासून कापड तयार करण्याचा कारखाना, पिठाची चक्की, बेकरी अशी ठिकाणेसुद्धा पाहिली. शुक्रवारी गुड फ्रायडेची सुटी असूनसुद्धा विद्यार्थी मोठ्या
प्रमाणात उपस्थित होते. वकील आणि आरोपी यांचा जवळचा संबंध असल्यामुळे या कारागृहास भेट देण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.