पनवेल : वार्ताहर
फेसबुकवरून ऑनलाइन महिलांचे कपडे मागवणे उलवे भागातील महिलेस चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणात सायबर चोरट्याने कुरीयर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून या महिलेने मागविलेले ऑनलाइन कपड्याचे पार्सल रद्द होऊ नये यासाठी गंडा घालून खात्यातून एक लाख 68 हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे उघडकीस आले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी या प्रकरणी सायबर चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
फसवणूक झालेली 45 वर्षीय महिला उलवे भागात राहण्यास असून एप्रिल महिन्यामध्ये या महिलेने फेसबुकवरील जाहिरातीतून मिळालेल्या व्हॉट्सअॅपवरून ऑनलाइन महिलांचे ड्रेस मटेरीयलचे कपडे मागवले होते. 1300 रुपये फोन पे द्वारे पाठवून दिल्यानंतर तीन दिवसामध्ये त्यांच्या कपड्याचे पार्सल कुरीयरद्वारे घरपोच मिळाले होते. त्यामुळे जून महिन्यामध्ये या महिलेने पुन्हा त्याच व्हॉटस्अॅप वरुन चॅट करुन 950 रुपये किंमतीचे ड्रेस मटेरियलचे कपडे मागविले होते. त्याचे पैसे देखील त्यांनी ऑनलाईन पाठवून दिले होते. त्यानंतर या महिलेने 800 रुपये पाठवून आणखी एक ड्रेस मटेरियल मागविले होते. या ड्रेस मटेरियलचे पार्सल पाठवण्यात आल्याचा मेसेज तक्रारदार महिलेला तत्काळ मिळाला. मात्र, दोन दिवसापूर्वी मागविलेल्या पार्सलबाबत मेसेज न आल्याने त्याची माहिती घेण्यासाठी या महिलेने मारुती कुरीयरचे गुगलद्वारे ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका सायबर चोरट्याने मारुती कुरीयर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे भासवून या महिलेला संपर्क साधला. त्यांनी ऑनलाइन मारुती कुरीयर ट्रॅक केल्यामुळे त्यांच्या पार्सलचे कुरीयर डीअॅक्टीवेट झाल्याचे सांगून ते अॅक्टीवेट करण्यासाठी पाच रुपये पाठविण्यासाठी युपीआय क्रमांक पाठवून दिला. त्यामुळे सायबर चोरट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून या महिलेने पाच रुपये देणार असल्याचे सांगितल्यानंतर त्याने फोन बंद केला.
दरम्यान, या महिलेला संशय आल्याने तीने गुगलवरुन एसबीआय कस्टमर केअरचा नंबर शोधून त्यावर संपर्क खाते बंद करण्यास सांगितले. याच कालावधीत सायबर चोरट्याने वेगवेगळ्या युपीआय ट्रान्झेक्शनद्वारे या महिलेच्या खात्यातील एक लाख 68 हजार रुपये काढून घेतले. प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेने न्हावा शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.