नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गडकिल्ल्यांपासून सोशल नेटवर्किंगपर्यंत सगळीकडेच शिवजयंतीचा उत्साह दिसून आला, मात्र हा शिवजन्मोत्सव सोहळा केवळ राज्य किंवा देशापुरता मर्यादित राहिला नसून जगभरातील भारतीय मोठ्या उत्साहात शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना दिसून आले. महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील वकिलातीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डेप्युटी कौन्सिल जनरल शत्रुघ्न सिन्हा, सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, सिनेट सदस्य केविन थॉमस उपस्थित होते. सर्वांनी फेटे बांधून भाषणे केली. वकिलातीच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमासाठी शेकडो भारतीयांनी उपस्थिती दर्शवली होती. सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सिनेट सदस्य थॉमस यांनी शिवजयंतीनिमित्त मला शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग दाखवणारे छोटे नाटुकलेही सादर करण्यात आले. अमेरिकेतील पीटसबर्ग शहरात हिंदू जैन देवस्थानतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. या वेळी सुमारे 75 भारतीयांनी एकत्र येऊन शिवरायांना मानवंदना दिली. केवळ मराठीच नव्हे, तर इतर भाषिक लोकांनीदेखील मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन शिवरायांविषयीचे प्रेम प्रकट केले. या वेळी विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लहान मुलांना भारताचा इतिहास आणि संस्कृतीची प्राधान्याने ओळख व्हावी यासाठी वेषभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी लहानग्यांनी बाळकृष्ण, राधा, जिजाऊ, झाशीची राणी, निर्मला सीतारामन, भारतीय सैनिक अशा अनोख्या संस्कारक्षम वेषभूषा करून उपस्थितांची मने जिंकली.