देशातील पहिल्या आदिवासी महिला सर्वोच्च पदावर विराजमान
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान झाल्यानंतर गुरुवारी (दि. 21) संसद भवनात मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या भरघोस मतांनी विजयी झाल्या असून त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर देशभरात भारतीय जनता पक्षासह आदिवासी समाजबांधवांनी एकच जल्लोष केला. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.
आजपर्यंतच्या राष्ट्रपतींच्या यादीमध्ये द्रौपदी मुर्मू या 15व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. महिनाभरासाठी कार्यवाहक राष्ट्रपती असलेले मोहम्मद हिदायतुल्लाह याचा उल्लेख यादीत नाही आणि दोनदा राष्ट्रपती झालेले व्ही. व्ही. गिरी यांचा यादीत एकदाच उल्लेख केल्यामुळे मुर्मू या 15व्या राष्ट्रपती ठरतात.
पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत सुरुवातीपासूनच द्रौपदी मुर्मू यांनी आघाडी घेत त्यांना 809 मते आणि विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना 329 मते पडली. त्यानंतर दुसर्या टप्प्यातही मुर्मू यांनी आघाडी घेतली. द्रौपदी मुर्मू यांना एकूण 5 लाख 77 हजार 777 मते तर यशवंत सिन्हा यांना दोन लाख 61 हजार 60 मते मिळाली. मुर्मू यांच्या विजयानंतर देशभरात आदिवासी समाजबांधवांनी जल्लोष केला.
मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पेढे भरवून जल्लोष साजरा केला. या वेळी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राज पुरोहित व चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार तमिळ सेल्वन व प्रदेश प्रवक्ते अतुल शाह यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.