जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांचा विश्वास


मुरूड : प्रतिनिधी
अलिबाग मुरूड मतदारसंघातील वीज, पाणी व रस्ते हे प्रश्न विद्यमान आमदार पंडित पाटील यांना सोडवता आले नाहीत. त्यामुळे जनता कमालीची नाराज झाली आहे. त्यांना आता बदल हवाय. त्यामुळे या मतदारसंघात या वेळी निश्चित बदल होईल, असा विश्वास या मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला. मुरूड शहरातील भाजीमार्केट परिसरात झालेल्या जाहीर सभेत दळवी बोलत होते. आपल्याला मतदारांचा उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, निवडून येताच रस्तेविकासाच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. महायुतीचा आमदार झाल्यावर जनतेच्या इच्छा निश्चित पूर्ण होतील, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे यांनी दिली. कुचकामी शेकाप आमदाराला घरी बसवा, असे आवाहन भाजपचे जगदिश पाटील यांनी केले. महायुतीचा आमदार निवडून येण्यासाठी मतदारांनी भरघोस मतदान करावे, असे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी सांगितले. या वेळी मुरूड शहरातील गावदेवी पाखाडीतील कैलास ठाकूर, सुदाम जगताप, निकेश जगताप आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. या वेळी उपनगराध्यक्ष नौशिन दरोगे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती अशोक धुमाळ, पाणी पुरवठा सभापती प्रमोद भायदे, भाजप तालुकाप्रमुख महेंद्र चौलकर, जिल्हा उपप्रमुख प्रशांत मिसाळ, तालुकाप्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, विजूभाऊ कवळे, संपर्कप्रमुख विराज चावरी, प्रवीण बैकर, संदीप पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.