एमटीडीसीमध्ये झाली आढावा बैठक
कर्जत : बातमीदार, बातमीदार
माथेरानमध्ये इ-वाहने चालवण्यासाठी तेथील रस्त्यांवर तीन महिने इ-वाहनांची चाचणी घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात आला.
माथेरानची भौगोलिक रचना आणि नियम लक्षात घेऊन इ-वाहनांच्या चाचणीसाठी शासकीय स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे, त्या समितीची आढावा बैठक माथेरानमधील एमटीडीसी सभागृहात घेण्यात आली. इ-वाहनांची चाचणी घेण्याच्या आदेशबाबत माथेरान नगर परिषदेकडून कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. रायगडाच्या निवासी उपजिल्हाधिकारी पद्श्री बैनाडे यांच्यासह पोलीस उपाधीक्षक विजय लगारे, माथेरानचे महसूल अधीक्षक दीक्षांत देशपांडे, पोलीस अधिकारी शेखर लव्हे, वनाधिकारी उमेश जंगम यांच्यासह राज्य प्रदूषण नियंत्रक मंडळ, राज्य प्रादेशिक परिवहन विभाग तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत माथेरानमध्ये इ वाहनांची प्रत्यक्ष चाचणी घेण्याची कार्यवाही सुरु केली जाईल, अशी माहिती माथेरान नगर परिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी या वेळी दिली. श्रमिक रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी शासनाच्या प्रयत्नाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.