Breaking News

भाज्यांनी शंभरी ओलांडली

गवार, वाटाणा 160 रुपयांवर

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा 140 ते 160 रुपये किलो व गवार 100 ते 160 रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी 25 रुपये मोजावे लागत आहेत.

बाजार समितीमध्ये सोमवारी 651 वाहनांमधून 26 हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये 4 लाख 64 हजार जुडी पालेभाज्यांचाही समावेश आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी साधारणत: तीन हजार टन कृषिमालाची व 5 ते 7 लाख जुडी पालेभाज्यांची विक्री होत असते. आवक कमी झाली असल्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भेंडी, गवार, घेवडा, ढोबळी मिरची, राजमा, तोंडली, दुधी  या भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरपेक्षा जास्त झाले आहेत.

कोथिंबिरीसह पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. सर्वच भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो 16 ते 22 रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो दराने विकला जात आहे.

पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक कमी होत आहे. आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.  इतर भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोचे दर नियंत्रणात आहेत.

-स्वप्निल घाग, भाजीपाला विक्रेता

कांदा, बटाटा, लसनाचे दर नियंत्रणात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा, बटाटा, लसनाची आवक वाढल्याने सध्या दर नियंत्रणात आहेत. घाऊक बाजारात कांदा 9 ते 16 रुपये किलो असून बटाटा 14 ते 19 रुपये किलो आहे; तर लसनाचे दर 8 ते 40 रुपये किलो आहेत. कांद्याचे दर हे सप्टेंबर महिन्यापर्यंत स्थिर राहतील. त्यानंतर जुना कांदा संपुष्टात आल्यानंतर दर वाढण्याची शक्यता असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

सध्या बाजारात पुणे व नाशिक जिल्ह्यामधून दररोज 80 ते 85 गाड्या कांद्याची आवक होत आहे. बटाट्याचे भावही स्थिर असून 14 ते 19 रुपये किलो दर आहे. बाजारात बटाट्याच्या 35 ते 40 गाड्यांची आवक होत आहे. सद्यस्थितीत गुजरात व उत्तर प्रदेशातून बटाटा मोठ्या प्रमाणात येत आहे.

घाऊक बाजारात लसूण 8 ते 40 रुपये किलोने असून इंदोर व गुजरातमधून बाजारात आवक सुरू आहे. दोन महिन्यांच्या तुलनेत कांद्याचे दर चार रुपयांनी वाढले आहेत, तर बटाट्याचा दर दोन रुपयांनी वाढला आहे. लसनाच्या दरातही किंचित वाढ झाली असली तरी हे दर स्थिर असल्याचे एपीएमसीतील व्यापारी अशोक वाळुंज यांनी सांगितले.

     घाऊक दर

                25 जुलै         25 जून

कांदा        9 ते 16         6 ते 11

बटाटा      14 ते 19        12 ते 17

लसूण     8 ते 40         7 ते 30

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply