मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष राष्ट्रहीत विचारात घेऊन राजकारण करतो. मात्र विरोधी पक्ष विनाकारण भाजपला विरोध करतांना पक्षाची चुकीची प्रतिमा मांडतात.भाजप मुस्लिम विरोधी नसून राष्ट्रीय विचारधारा मानणारा पक्ष आहे, हे पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
भाजप महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते.अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख, राष्ट्रीय उपाध्यक्ष एस एम अक्रम, प्रदेश सचिव जुनैद खान, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पत्रकार सय्यद अकबर,सोशल मीडियाचे साबीर शेख,सलीम बागवान, रशीद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रात भाजप पुन्हा सत्ताधीन झाली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. पुढच्या अडीच वर्षात सरकार म्हणून सक्षमपणे काम करतांना पक्षाची राष्ट्रीय प्रतिमा महाराष्ट्रात देखील बिंबवणे भाजप कार्यकर्त्यांचे कर्तव्य असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
अल्पसंख्यांक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी एजाज देशमुख यांनी महाराष्ट्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये तसेच इतर महत्वाच्या शासकीय योजनामध्ये अल्पसंख्यांक लोकांना भरघोस मदत केली आहे. त्याबद्दल भाजपच्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांनी सर्वाना माहिती देणे गरजेचे आहे असे म्हणून सगळ्यांना अल्पसंख्यांक समाजामध्ये पक्षाचे विधायक स्वरूप मांडून विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी जनसंपर्कात राहण्याचे आवाहन केले.
एक दिवसीय बैठकीनंतर भल्यामोठया राष्ट्रीय तिरंगा फडकवण्याचा कार्यक्रम झाला पंधरा ऑगस्ट पर्यंत सर्वत्र घर घर तिरंगा अभियान यशस्वी कार्यासाठी यावेळी जबाबदार्या देण्यात आल्या.