Breaking News

अखेर जेएनपीए प्रशासन झुकले

भाजप पदाधिकार्‍यांमुळे कंत्राटी कामगारांच्या पगार वाढीचा करार पूर्ण

उरण : रामप्रहर वृत्त

जेएनपीएमधील कॉन्ट्रॅक्ट (कंत्राटी) वर्कर्सच्या वेतन कराराबाबत कामगार नेते सुधीर घरत यांनी घेतलेली आक्रमक भूमिका व आमदार महेश बालदी यांच्या यशस्वी मध्यस्तीने जेएनपीए प्रशासन अत्यंत जलद गतीने कार्यरत होऊन कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स पगारवाढीचा करार जेएनपीए जनरल कामगार संघटनेसोबत मंगळवारी जेएनपीए प्रशासन भवन येथे झाला.

गेली 27 महिने 950 कामगारांचा प्रलंबित असलेला पगारवाढीचा प्रश्न जेएनपीए जनरल कामगार संघटनेने ऐरणीवर आणला. 29 जुलै 2022 पासून काम बंद आंदोलनाची नोटीस प्रशासनाला दिली होती, त्यामुळे प्रशासन हादरले. 26 जुलै रोजी जेएनपीए चेअरमन संजीव सेठी यांनी पगारवाढीच्या प्रस्तावावर सही करून बुधवारी (दि. 27) पगारवाढीचा करार जेएनपीए जनरल कामगार संघटनेसोबत करावा अशा सुचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्याप्रमाणे बुधवारी वेतन वाढीच्या करारावर जेएनपीए जनरल कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष सुधीर घरत, सरचिटणीस जनार्दन बंडा यांनी स्वाक्षर्‍या केल्या. या वेळी प्रशासनाच्या वतीने मुख्य व्यस्थापक जयंत ढवळे, व्यवस्थापक मनीषा जाधव, एस. एस. पगारे, संतोष मोरे हे अधिकारी उपस्थित होते.

या नवीन वेतन करारामुळे कामगारांना किमान वेतन रुपये 23,570 व कमाल वेतन रुपये 33,760 मिळणार आहे. यापूर्वी कामगारांना राज्य सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळत होते, परंतु या करारामध्ये केंद्र सरकारच्या किमान वेतन कायद्यानुसार किमान वेतन मिळणार आहे, तसेच यापूर्वी न मिळणारी ग्रॅच्युइटी, 8.33 टक्के बोनस, मेडीक्लेम सुविधा यांचा नव्याने समावेश झाला आहे याचे सारे श्रेय समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा याकरिता कायम प्रयत्नशील असणार्‍या दमदार आमदार महेश बालदी यांचे आहे, असे सुधीर घरत यांनी सांगितले. संपूर्ण उरण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या या वेतन कराराबद्दल सर्वच थरातुन व कामगार वर्गातून कामगार नेते सुधीर घरत व सुरेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, जेएनपीए चेअरमन संजीव सेठी, व्हाईस चेअरमन उन्मेष वाघ, मुख्य व्यस्थापक जयंत ढवळे यांचे आभार सुरेश पाटील यांनी मानले आहेत.

अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नवीन वेतन करार हा फक्त आमच्या संघर्षाचा विजय असून कुणीही फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.

-सुधीर घरत, कामगार नेते

आमदार महेश बालदींची महत्त्वाची भूमिका

नवीन वेतन करार व्हावा याकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका आमदार महेश बालदी यांनी निभावली, तसेच नवीन वेतन करार हा भारतीय मजदूर संघाच्या विचारांना अनुसरून वागणार्‍या कामगारांच्या एकतेचा विजय आहे, असे कामगार नेते सुरेश पाटील म्हणाले.

Check Also

अलेक्झांड्रा थिएटरची इमारत झाली 103 वर्षांची

आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढी मुव्हीज (आजची युवा पिढी चित्रपटाला मुव्हीज म्हणते) पाहण्यासाठी मल्टीप्लेक्स, मोबाईल …

Leave a Reply