वायरमन, लाईनमनची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करा -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्त
येत्या पंधरा दिवसांत वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात कार्यवाही केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला दिले आहे. तशा आशयाचे त्यांचे निवेदन गुरुवारी (दि. 28) भाजपचे तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, युवा नेते योगेश लहाने यांनी संबंधित अधिकार्यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील उसर्ली खुर्द, शिवकर, चिखले, कोळखे, कोन, भिंगार, वारदोली या ग्रामपंचायत हद्दीतील कोळखे, पेठ, पळस्पे फाटा, चिखले, सांगडे, भिंगार, भिंगारवाडी, शेडूंग, भेरले, वारदोली, बेलवली, ठाकूरवाडी, कोन, बोर्ले, अजिवली, उसर्ली खुर्द, डेरवली या गावांमध्ये विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने गेल्या दिड ते दोन महिन्यांपासून वायरमन व लाईनमन ही दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे सध्याच्या मुसळधार पडत असलेली पावसाची परिस्थिती पाहता नागरिकांना विद्युत संदर्भातील अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या विभागातील ग्रामस्थांनी विद्युत मंडळाच्या अधिकार्यांकडे प्रत्यक्ष बाब निदर्शनास आणूनसुद्धा अद्यापपर्यंत ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि पावसाळ्याची परिस्थिती पाहता वायरमन व लाईनमनची रिक्त पदे भरण्यासंदर्भात येत्या 15 दिवसांत कार्यवाही व्हावी, अन्यथा स्थानिक पदाधिकार्यांमार्फत आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनातून अधोरेखित करण्यात आले आहे.