पनवेल : वार्ताहर
रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील फुंडे येथील वीर वाजेकर महाविद्यालयात महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल व आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयसीआयसीआय व एनआयआयटी तर्फे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी सेमिनार व नोकरभरतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक आयक्यूएसीचे प्रमुख डॉ. आर. बी. पाटील यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख प्लेसमेंट सेलचे चेअरमन डॉ. आमोद ठक्कर यांनी केले.
आयसीआयसीआय-एनआयआयटीचे रिजनल मॅनेजर निरंजन मोहिते यांनी उपस्थित सर्व इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. त्याचबरोबर मुलाखत देण्यासाठी कशी तयारी करावी या विषयावरही विस्तृत विवेचन केले.
आयसीआय सी आय-एनआयआयटीचे डेप्यूटी मॅनेजर आशिष राऊत हे उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मुलाखती घेतल्या. या उपक्रमात सुमारे 108 इच्छुक उमेदवार उपस्थित होते.
प्रत्यक्ष मुलाखतीतून त्यांचे कल व आवड लक्षात घेऊन व त्यांचे शैक्षणिक गुणवत्ताही लक्षात घेऊन प्रत्यक्षात 33 विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतून निवड झालेल्या योग्य उमेदवारांना तीन आठवड्यांचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष नेमणूक देण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आयसीआयसीआय-एनआयआयटीच्या सिद्धी दिवेकर यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. जी. पवार यांनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती करून दिली. उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ. विलास महाले यांनी मानले. उमेदवारांच्या मुलाखती व लेखी परीक्षेचे नियोजन डॉ. झेलम झेंडे व प्रा. भूषण ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन दीक्षिता म्हात्रे व प्रांजल भोईर यांनी केले.