मच्छीमार बोटींवर खलाशांची लगबग; कामांना वेग
उरण ः प्रतिनिधी, वार्ताहर
दोन महिन्यांच्या बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरल्याने बंदरांमध्ये मच्छीमारांची विविध कामांसाठी लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा काळ हा माशांच्या प्रजननाचा असल्याने 1 जूनपासून पुढील 60 दिवस म्हणजेच 31 जुलैपर्यंत शासन आदेशान्वये मासेमारी बंद असते. बंदीनंतर 1 ऑगस्टपासून पुन्हा मच्छीमार बांधव मासेमारीला सुरुवात करतात. खवळलेला समुद्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून शांत होतो. त्यानंतर खोल समुद्रातील मासेमारी नव्या जोमाने सुरू होते. विशेषत: नारळी पौर्णिमेनंतर मासेमारीसाठी पोषक वातावरण असते. या पार्श्वभूमीवर कोळी बांधव सज्ज होत आहेत. सध्या सर्व बंदरांत शेकडो मासेमारी ट्रॉलर्सवर खलाशांची लगबग सुरू आहे. जाळी व बोटींची डागडुजी, रंगरंगोटी आणि इतर तत्सम कामांना वेग आला आहे. त्याचबरोबर मच्छीमार संस्थांकडून रांगा लावून डिझेल खरेदीऐवजी खुल्या बाजारातून डिझेल खरेदी करून मासेमारीला प्रारंभ करण्याच्या तयारीत मच्छीमार आहेत.