मुरूडमधील आदिवासी महिलांचे तहसीलदारांना निवेदन
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत बेलीवाडी आदिवासी भागात गावठी दारूचे धंदे तेजीत असून त्याचा नाहक त्रास तेथील आदिवासी महिलांना सहन करावा लागत आहे. घरातील कर्ते पुरुष दारूच्या व्यसनाच्या आहारी गेले असल्याने दारूचे धंदे बंद करावेत, अशी मागणी बेलीवाडी परिसरातील महिलांनी निवेदनाद्वारे तहसीलदार रोहन शिंदे यांच्याकडे केली आहे. तहसीलदारांना दिलेल्या या निवेदनात नमूद केले आहे की दारूच्या धंद्यांमुळे सर्व पुरुष व वयात आलेली मुले या व्यसनात गुंतली आहेत. दारू पिऊन ते घरच्या मंडळींना मारझोड करतात. व्यसनापायी कामधंदा टाळतात. याचा संपूर्ण त्रास परिवाराला सहन करावा लागत आहे. याबाबत तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले की, या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्याला पत्र देण्यात आले असून परिस्थिती तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.