केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांचे प्रतिपादन; खारघरमध्ये आयुष संकुल इमारतीचे द्घाटन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय पारंपरिक औषधी पद्धती अनेक शतकांपासून मानवी जीवनाच्या समृद्धीवर त्यांचा प्रभाव सिद्ध करीत आहेत. आधुनिक वैद्यकशास्त्रासोबतच औषधाच्या या शाखेचे फायदे समाविष्ट करण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे आणली होती, असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी शनिवारी (दि. 30) खारघर येथे केले. त्यांच्या हस्ते आयुष बिल्डिंग कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आयुष मंत्रालय होमिओपॅथी सल्लागार डॉ. संगीता दुग्गल, राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराना, आयुषचे संचालक डॉ. राज मनचंदा उपस्थित होते. खारघर येथील आयुष संकुलाच्या इमारतीमध्ये होमिओपॅथीसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआयएच) आरआरआयएच आणि आणि युनानी औषधींसाठी प्रादेशिक संशोधन संस्था (आरआरआययूएम) दोन्ही संस्था स्थित असतील. या वास्तूची पायाभरणी 28 डिसेंबर 2015 रोजी करण्यात आली. सिडकोने ही तीन मजली संकुल इमारत 5860 चौरस मीटरच्या बांधकाम क्षेत्रासह 1999.82 चौरस मीटरच्या भूखंडावर बांधली आहे. या वेळी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, आरआरआयएच आणि आरआरआययूएम या दोन संस्थांना अनुक्रमे ऍलर्जिक डिसऑर्डर आणि रेजिमेंटल थेरपीसाठी उत्कृष्ट केंद्र बनवण्याचा आमचा मानस आहे. आयुष मंत्रालयाच्या आदेशानुसार या दिशेने कामास आधीच सुरुवात झाली आहे. या संस्था बालरोग, वृद्ध आणि सामान्य लोकांसाठी रुटीन हेमॅटोलॉजिकल आणि बायोकेमिस्ट्रीसाठी रुग्ण सल्ला, औषधे व प्रयोगशाळेची सुविधा प्रदान करतील आणि अनुक्रमे होमिओपॅथी व युनानीचे स्वतंत्र प्रभारी यांच्या नेतृत्वाखालील आहेत. आरआरआयएच आणि आरआरआययूएम लवकरच ऍलर्जीक विकारांसाठी होमिओपॅथी संस्था म्हणून आणि इलाज-बिट-तदबीर म्हणजेच रेजिमेंटल थेरपीचे उत्कृष्ट केंद्र म्हणून विकसित केले जातील असा प्रस्ताव आहे, असेही ना. सोनोवाल यांनी सांगितले. पारंपरिक भारतीय औषधी पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेला पुढे जोडून ना. सोनोवाल पुढे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या पारंपरिक भारतीय औषध पद्धतीला बळकटी देण्याच्या दृष्टिकोनानुसार चांगल्या रुग्णसेवेसाठी आपल्या स्वतःच्या पारंपरिक औषधी पद्धतींचा प्रचार आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी आयुष मंत्रालय पावले उचलत आहे. आज या पायाभूत सुविधांच्या उद्घाटनासह आम्ही या उद्दिष्टाच्या आणखी एक पाऊल पुढे जात आहोत. या संकुलाच्या उद्घाटनाने महाराष्ट्रात आयुष औषधी पद्धतीला चांगलाच वेग आला आहे. मला आशा आहे की या दोन संस्थांमधून होणार्या कामाचा लाभ मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना मिळेल. सीसीआरएच महासंचालक डॉ. सुभाष कौशिक आणि सीसीआरयूएम महासंचालक डॉ. असीम अली खान हे मुख्य आयोजक होते. या कार्यक्रमाचे संचालन आरआरआयएच नवी मुंबई प्रभारी अधिकारी डॉ. रमेश बावस्कर आणि आरआरआययूएम नवी मुंबई प्रभारी अधिकारी डॉ. निर्मला देवी यांनी केले. या समारंभास भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी महापालिका महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, माजी स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, माजी नगरसेवक निलेश बावीस्कर, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, युवा नेते समीर कदम, किरण पाटील, दिलीप जाधव, गीता चौधरी, संध्या शारबिद्रे, बिना गोगरी, शोभा मिश्रा, कांचन बिर्ला, संतोष शर्मा यांच्यासह होमिओपॅथिक आणि युनानी संशोधक, शास्त्रज्ञ, आयुष प्रणाली आणि आधुनिक औषधांचे वरिष्ठ चिकित्सक, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य आणि विद्यार्थी आणि रुग्णही होते. त्याचप्रमाणे राज्य शासनाच्या प्रशासकीय आणि स्थानिक अधिकार्यांसह या संस्थांना प्रामाणिक सेवा देणारे माजी कर्मचारीदेखील हजर होते.