कर्जतमध्ये प्रशासनाला निवेदन
कर्जत : बातमीदार, प्रतिनिधी
राज्य शासनाने लावलेले लॉकडाऊनसदृश निर्बंध उठवावेत, या मागणीसाठी कर्जत तालुका भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे. भाजप व्यापारी आणि उद्योग सेलच्या वतीने त्याबाबत रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यात औद्योगिक वसाहत नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार नाही. मात्र कृषी पर्यटन संकल्पना स्थानिक शेतकर्यांनी राबविली आहे. त्यातून रोजगार निर्मिती केली जात आहे. त्या पर्यटन स्थळांवर विकेंडला पाहुणे येतात आणि काही रोजगार उपलब्ध होत असतो. मात्र राज्य शासनाने शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असल्याने कर्जत तालुक्यातील जनतेचा रोजगार हिरवला जाणार आहे. अर्थचक्र कोलमडून गेले असताना विकेंड लॉकडाऊन जाहीर करून शासनाने आर्थिक चक्रे थांबवली आहेत. कर्जत तालुक्याचे आर्थिक चक्र सुरू राहावे, यासाठी राज्य शासनाने विकेंडला लावलेले निर्बंध शिथिल करावेत, अशी मागणी भाजप व्यापारी आणि उद्योग सेलने रायगड जिल्हाधिकारी आणि कर्जत तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
भाजप व्यापारी सेलचे जिल्हा अध्यक्ष अशोक ओसवाल यांनी कर्जत तहसील कार्यालयात निवेदन देऊन शासनाने विकेंड लॉकडाऊनबाबत निर्णय न घेतल्यास भाजपकडून सर्व दुकाने उघडण्याचे आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा दिला आहे. त्यावेळी भाजप उद्योग सेलचे जिल्हा अध्यक्ष मंदार मेहेंदळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, व्यापारी सेलचे तालुका अध्यक्ष सुनील सोनी, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक सूर्यकांत गुप्ता, दिनेश सोळंकी, रोहित बाफना आदी उपस्थित होते.