सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष
मुरूड : प्रतिनिधी
शहरातून सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर मासळी मार्केट आहे. अनेक दिवसापासून या मासळी मार्केट परिसरातील रस्त्यावर दोन मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचून तलाव निर्माण झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम खाते हे खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही कार्यवाही करीत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुरूड शहरातून जंजिरा किल्ल्याकडे जाणार्या रस्त्यावर असंख्य पर्यटकांची नियमीत वर्दळ असते. शिवाय मासळी मार्केट असल्यामुळे सदरचा रस्ता गर्दीचा आहे. मासळी मार्केटला लागून कोळीवाडा आहे. या परिसरातील गणरायांचे आगमन याच रस्त्याने होत असते. या रस्त्याच्या मधोमध मोठे खड्डे पडले असल्याने गणरायांचे आगमन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या या खड्ड्यांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने सदरचे खड्डे तलावासारखे झाले आहेत. या प्रमुख रहदारीच्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.