पनवेल, उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
भारतीय नौदलाच्या पथकाकडून प्रत्येक जिल्हाच्या अंतर्गत असलेल्या विविध मासेमारी गावांमध्ये सागरी किनारी भागातील गावांमध्ये सागरी पोलीस ठाणे किनारी भागात सुरक्षा जागरूकता आणि डेटा संकलन मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने उरण सागरी पोलीस ठाणे हद्दीत उरणमधील करंजा मच्छीमार सोसायटी येथे भारतीय नौदलाचे पथकातर्फे मोहीम राबवण्यात आली.
या वेळी मच्छिमार बांधवांनी मासेमारीकरिता खोल समुद्रात मासेमारीकरिता जाताना व्हीएचएफ वायरलेस सेट, मोबाइल फोन सोबत घेऊन जाणे, बोटींमध्ये सुरक्षेकरिता जीव रक्षक साधन सामुग्री जवळ बाळगणे व मासेमारी करिता जे मार्ग देण्यात आलेले आहेत त्याच मार्गाचा वापर करण्यात यावा, तसेच मासेमारी करीत असताना नियमितपणे बोटींची मुळ कागदपत्रे व बोटीवर असलेल्या प्रत्येकाकडे फोटो आयडी कार्ड जवळ बाळगणे, समुद्रात कोणत्याही प्रकारची अनोळखी बोट आढळून आल्यास तत्काळ दूरध्वनी क्रमांक 22751026 / 1022 / 1031वर तसेच एमआरसीसी. टोल फ्री क्र. 1554, ओएनजीसी हेल्पलाईन 1800221956 वर संपर्क करणे याबाबत सूचना देण्यात आल्या.
अभियानामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट कमांडर डेविड सिंह, कोस्टगार्ड प्रधान अधिकारी पी. एम. सतदेव, ओएनजीसीचे सुरक्षा निरीक्षक अधिकारी स्वनिल ठाकुर व सुनिल कुमार, सागरी सुरक्षा शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत धरणे, उरण सागरी पोलीस ठाणे, सपोनि विशाल राजवाडे, सागरी सुरक्षा शाखा, नौका विभाग, साईनाथ दळावी, बंदर विभागाचे, पोलीस निरीक्षक, देविदास जाधव, करंजा मासेमारी सोसायटी अध्यक्ष भालचंद्र कोळी व सागरी किनारी गावातील 110 सागर रक्षक दल सदस्य, मच्छीमार बांधव उपस्थित होते.