Breaking News

राज्यातील शेतकर्‍यांना सरकारचा मोठा दिलासा

अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईत दुपटीने वाढ

मुंबई : प्रतिनिधी
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकर्‍यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या नुकसानभरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे आणि शेतजमिनींचे मोठे नुकसान झाले होते. बाधित शेतकर्‍यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून पिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी 22232.45 लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे.  येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे करण्यात येईल. त्यानुसार हा निधी विभागीय आयुक्तांना किंवा शासनाचे आदेश येतील त्याप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबत महसूल विभागाने शासन निर्णय घेतला आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासन निर्णयात म्हटले आहे की, पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयानुसार संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर वितरीत करण्यात येत असली तरी लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तीय शिस्तीच्या दृष्टिकोनातून संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी प्रत्यक्ष गरजेनुसार कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच शासन निश्चित करेल अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रक्कम हस्तांतरीत करावी.
अशी मिळणार मदत
महसूल व वन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी सहा हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये, बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13 हजार 500ऐवजी आता 27  हजार रुपये मिळणार आहेत. याशिवाय बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजारऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचे या शासन निर्णयात म्हटले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply