Breaking News

माणगावमध्ये आदिवासी दिन उत्साहात

विविध क्षेत्रातील मान्यवर आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित

रोहा : प्रतिनिधी

एकलव्य आदिवासी सामाजिक सेवा संस्थेतर्फे  माणगावमधील कुणबी भवन येथे मंगळवारी (दि. 9) जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. या वेळी येरद आदिवासीवाडीतील युवतींनी पारंपारिक आदिवासी नृत्य सादर केले. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त माणगाव मोर्बा रोड ते कुणबी भवन अशी शोभायात्रा काढण्यात आली होती. विविध पारंपरिक वेशभूषा करून आदिवासी बांधव या शोभायात्रेत सहभागी झाले होते. त्या नंतर कुणबी भवनात झालेल्या कार्यक्रमात प्रा. सुनिल देवरे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ज्येष्ठ समाजसेविका उल्का महाजन, पत्रकार महादेव सरसंबे, प्रफुल्ल पवार, मनोज घोसाळकर, शाम लोखंडे, वसंत भाऊ पाटील (चिरनेर, ता. उरण), अ‍ॅड. अनिकेत ठाकूर (देगाव माणगाव), शरद गांगल (महाड),  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेणच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव, वरिष्ठ संशोधन अधिकारी गजेंद्र केंद्रे (पुणे), प्रमोद जाधव, कृष्णा भोसले, भाई जाधव यांना आदिवासी मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने प्रांताधिकारी उमेश बिरारी यांनी पुरस्कार स्वीकारला.

माणगाव तहसीलदार प्रियांका आयरे, ओबीसी प्रवक्ते सुनील देवरे, संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष भिवा पवार, दिनेश कातकरी, महादेव कोळी, उमेश जाधव, बबन कोळी, राम कोळी, संजय कोळी यांच्यासह आदिवासी बांधव या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कर्जतमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन

कर्जत : बातमीदार

आंतराराष्ट्रीय आदिवासी दिनानिमित्त कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाच्या संघटनांनी मंगळवारी (दि. 9) जोरदार शक्तिप्रदर्शन केले. तालुक्यातील प्रत्येक आदिवासी वाडीमध्ये ग्रामस्थांनी बॅनरबाजी केली. आदिवासी दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी आदिवासी समाज रस्त्यावर उतरल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

कर्जत तालुक्यातील 12आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि आदिवासी समन्वय समिती यांच्या माध्यमातून मंगळवारी आंतराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आदिवासी समाजातील विविध कला पथकांचा कामडी, फुगडी नृत्य, टिपरी नृत्य, जंगली डान्स, टाळ्या वरचा नाच,  संस्कृतीचे दर्शन घडवणारे नाच सादर करण्यात आले.

आदिवासी दिन उत्सव सोहळा समिती अध्यक्ष कांता पादीर यांच्या अध्यक्षतेखाली भव्य सोहळा साजरा केला. या वेळी कर्जत तालुक्यात बाईकरॅली काढण्यात आली. नेरळ येथील कोतवालवाडी ट्रस्ट येथील स्तंभास हार अर्पण करून रॅलीला सुरुवात झाली. मोहाचीवाडी येथील नाग्या महादू कातकरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फलकास हार अर्पण करण्यात आला. नेरळमधील छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. या वेळी पारंपारिक आदिवासी नाच सादर करण्यात आले. तसेच कळंब येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून आदिवासी पारंपरिक नाच आणि कार्यक्रम सादर केली.

आदिवासी समाजाचे कार्यकर्ते नारायण डामसे, नारायण करोटे, मालू निरगुडा, भरत शीद, बाळकृष्ण पादीर, जैतू पारधी, बुधाजी हिंदोळा, जयवंती हिंदोळा, सुरेश निरगुडे, दादा पादीर आदिंनी आदिवासी दिन कार्यक्रमाचे नियोजन केले होते.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply